Mithali Raj Harmanpreet Kaur, Women's T20 World Cup 2024: महिलांच्या टी२० विश्वचषक स्पर्धेचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय महिला संघाला साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर व्हावे लागले. दोन विजय आणि दोन पराभवांसह भारतीय संघ सेमीफायनलला आवश्यक लागणारे गुण मिळवू शकला नाही. भारतीय संघाने श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन आशियाई संघांना हरवले. पण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांनी भारताला मोठ्या फरकाने पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्याच फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. या पराभवानंतर आता कर्णधार हरमनप्रीत कौरच्या जागी एक नव्या दमाच्या खेळाडूने संघाचे नेतृत्व करावे, अशी इच्छा माजी कर्णधार मिताली राज हिने व्यक्त केली आहे. या पदासाठी तिने स्मृती मंधाना ऐवजी एक वेगळे नावही सुचवले आहे.
मिताली राज हिच्याकडून २०१६ मध्ये भारतीय महिला टी२० संघाचे कर्णधारपद हरमनप्रीतकडे आले. तेव्हापासून हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने तीन वेळा किमान सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. पण यावेळी पहिल्यांदाच भारताला साखळी फेरीत स्पर्धेबाहेर व्हावे लागले. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर मिताली राज हिने संघातील नेतृत्वबदलाबाबत महत्त्वाचे विधान केले. "जर संघनिवड समितीला काही बदल करायचे असतील तर त्यांनी कर्णधार बदलावा आणि एखाद्या तरुण चेहऱ्याला संधी द्यावी", असे मितालीने पीटीआयशी बोलताना सांगितले. ती पुढे म्हणाली, "जर संघात काही बदल करायचे असतील तर हीच योग्य वेळ आहे. आता जर तुम्ही उशीर केलात तर ऑक्टोबर २०२५ मध्ये वनडे वर्ल्डकप येणार आहे. त्यामुळे आता हे बदल करायचे नसतील तर नंतरही करु नका. वर्ल्डकप नजीक असताना असे मोठे बदल करणे योग्य नाही."
कर्णधार पदासाठी सूचवलं नाव...
"स्मृती मंधाना २०१६ पासून संघाची उपकर्णधार आहे. पण मला वाटतं आता कर्णधार म्हणून तरुण चेहरा द्यायला हवा. कर्णधार जितका तरुण असेल तितका जास्त काळ तो हे पद भूषवण्यास पात्र ठरेल. सध्या कर्णधारपदासाठी जेमायमा रॉड्रीग्ज उत्तम पर्याय ठरेल. ती केवळ २४ वर्षांची आहे. ती मैदानावर असताना संघाला खूप उर्जा प्रदान करते. ती सगळ्यांशी बोलत असते. यंदाच्या विश्वचषकात तिने चांगली कामगिरी करून साऱ्यांनाच इम्प्रेस केले आहे," असेही मिताली राज म्हणाली.