एडिलेड : आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2022 मध्ये बांगलादेशचा 5 धावांनी पराभव करत भारताने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. या सामन्यात भारताचा केएल राहुल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवसह गोलंदाज अर्शदीप सिंगने शानदार खेळी केली. नाणेफेक हारल्यानंतर भारताने फलंदाजी करताना बांगलादेशसमोर 184 धावांची भक्कम धावसंख्या उभारली होती. मात्र, पावसामुळे 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
बांगलादेश विरुद्धचा हा सामना खूपच रोमांचक झाला होता आणि भारतीय खेळाडू मैदानात जीवाची बाजी लावत होते पण एक व्यक्ती अशी होती जी मैदानाबाहेर राहून भारताच्या विजयासाठी जोर लावत होती. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून रघू हा भारतीय संघाचा सपोर्टिंग स्टाफ होता. रघू भारताच्या खेळाडूंना नेटमध्ये थ्रो डाऊनचा सराव करायला लावतो, पण बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तो वेगळ्या भूमिकेत दिसून आला.
दरम्यान, सामन्यात पावसामुळे आऊटफील्ड खूप ओले झाले होते, त्यामुळे खेळाडूंना फील्डिंग करताना घसरण्याचा धोका होता. अशा स्थितीत रघू बाऊंड्री लाईनवर खेळाडूंच्या शूजला लागलेला चिखल साफ करत होता. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने हातात ब्रश धरला आहे, त्या ब्रशद्वारे तो खेळाडूंचे बूट साफ करत होता. रघूची ही मेहनत आणि आणि खेळाडूंच्या दमदार कामगिरी, यामुळे भारताने बांगलादेशचा पराभव केला.
असा रंगला रोमहर्षक सामना!बांगलादेशविरुद्ध नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 184 धावा केल्या. केएल राहुल भारतासाठी फॉर्ममध्ये परतला आणि त्याने 50 धावांची शानदार खेळी केली. विराट कोहलीनेही 64 धावांचे योगदान दिले. तर सूर्यकुमार यादवनेही 16 चेंडूत 30 धावा केल्या. तत्पूर्वी, भारताच्या 184 धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशने तुफानी खेळी केली होती. लिटन दास व नजमूल शांतो यांनी बांगलादेशला दमदार सुरुवात करून देताना 7.1 षटकांत 68 धावांची भागीदारी केली. पावसाचा व्यत्यय आला तेव्हा DLS (डकवर्थ लुईस नियम) नुसार बांगलादेश 17 धावांनी आघाडीवर होता आणि सामना रद्द झाला असता त्यांना विजयी घोषित केले गेले असते. पण, पाऊस थांबला आणि बांगलादेशसमोर 16 षटकांत 151 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले.