Join us

टीम इंडियाला आणखी एक धक्का; पाकचा बुक्का पाडत दक्षिण आफ्रिकेनं साधला डाव

WTC चे दोन फायनलिस्ट पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर विराजमान झाल्याचे दिसते. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:15 IST

Open in App

Team India Slips To No 3 In ICC Test Rankings : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील ३-१ अशा पराभवामुळे टीम इंडियाचे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले. त्यानंतर आता टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियाची घसरण झाली आहे. टीम इंडिया टॉप २ मधून आउट झाली असून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरलेल्या दोन फायनलिस्ट पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर विराजमान झाल्याचे दिसते. 

पाकच्याा खांद्यावरून दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियावर निशाणा

एका बाजूला भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मालिका गमावण्याची वेळ आली. १० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी उंचावली. ही जखम ताजी असताना पाकच्या खांद्यावरून टीम इंडियावर निशाणा साधत दक्षिण आफ्रिकेनं मोठा डाव साधलाय. घरच्या मैदानातील कसोटी मालिकेत पाकिस्तानचा बुक्का बाडत आयसीसी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियाची जागा घेतलीये. भारतीय संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.

 टॉप २ मध्ये रंगणार आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ १२६ रेटिंग पॉइंट्ससह अव्वलस्थानी आहे. त्यांच्या पाठोपाठ आता दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर वर्णी लागली आहे. ११२ रेटिंग पॉइंट्स मिळवत दक्षिण आफ्रिकेनं टॉप २ मध्ये एन्ट्री मारलीये. या दोन्ही संघांनी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्रातील अखेरच्या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवत फायनल गाठली आहे. टीम इंडियाच्या खात्यात १०९  रेटिंग पॉइंट्स जमा असून संघाची कसोटी क्रमावारीत तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बांगलादेशचा संघ तळाला

आयसीसी कसोटी क्रमवारीत इंग्लंड (१०६ रेटिंग पॉइंट्स), न्यूझीलंड (९६ रेटिंग पॉइंट्स), श्रीलंका (८७ रेटिंग पॉइंट्स), पाकिस्तान (८३), वेस्टइंडिज (७५) आणि बांगलादेशचा संघ (६५ रेटिंग पॉइंट्स) हे संघ अनुक्रमे चौथ्या ते नवव्या स्थानावर आहेत.    

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआयसीसीआॅस्ट्रेलियाद. आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघइंग्लंडपाकिस्तानन्यूझीलंडवेस्ट इंडिजबांगलादेश