मुंबई - विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ काही दिवसांतच दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथे यजमान संघाविरोधात ३कसोटी, ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यातील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. या मालिकेमधून रोहित शर्माने माघार घेतली आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचा उपकर्णधार कोण असेल, असा प्रश्न पडला होता. मात्र आता बीसीसीआयने कसोटी संघाच्या उपकर्णधाराबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.
आतापर्यंत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाच्या उपकर्णधाराची धुरा होती. मात्र सुमार कामगिरीमुळे त्याच्याकडील उपकर्णधाराची जबाबदारी ही रोहित शर्मा कडे सोपवण्यात आली होती. मात्र दुखापतीमुळे रोहित शर्माने कसोटी मालिकेतून माघार घेतल्याने उपकर्णधारपद कोणाकडे सोपवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र संघाचा उपकर्णधार म्हणून बीसीसीआयने कुणाचीही निवड केलेली नाही. दरम्यान, या मालिकेसाठी कुणीही उपकर्णधार नसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
संघाच्या उपकर्णधारपदासाठी अजिंक्य रहाणे प्रबळ दावेदार आहे. मात्र, त्याचे संघातील स्थान निश्चित नाही. त्यामुळे उपकर्णधारपदी निवड केल्यावर त्याला संघाबाहेर बसवता येणार नाही. त्यामुळेच बीसीसीआय अशा नामुष्कीपासून वाचण्यासाठी अधिकृतरीत्या उपकर्णधारपदी नियुक्ती केलेली नाही.
मात्र संघाचा उपकर्णधार हासुद्धा महत्त्वपूर्ण असतो. कर्णधार मैदानाबाहेर गेल्यावर किंवा जखमी झाल्यावर संघाला उपकर्णधाराची आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत भारतीय संघ उपकर्णधाराची निवड न करता कर्णधार बाहेर गेल्यावर वरिष्ठ खेळाडूकडे संघाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेऊ शकतो. अशा परिस्थितीत ही जबाबदारी ऋषभ पंत किंवा आर. अश्विनकडे दिली जाऊ शकते.
भारताचा कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), के.एक. राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, प्रियांक पांचाल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रिद्धिमान साहा, आर. अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.