Yuzvendra Chahal Video : सध्या खेळल्या जाणाऱ्या आशिया कप आणि आगामी विश्वचषक 2023 साठी संघात स्थान न मिळाल्याने, भारतीय स्टार फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल इंग्लंडमध्ये खेळत आहे. त्याने केंट संघाकडून कौंटीमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्याच सामन्यात चहलने आपल्या दमदार फिरकीची जादू दाखवत फलंदाजाला चकित केले. चहलने केंटकडून पहिली विकेट घेतली. चहलची ही विकेट पाहून अनेकांना ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नची आठवण झाली.
चहलने बॉल जवळजवळ त्याच पद्धतीने फिरवला, ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियन महान खेळाडू लेग स्पिन करायचा. चहलच्या या फिरकी चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चहलचा चेंडू समजण्यात फलंदाज पूर्णपणे अयशस्वी होताना दिसला. फलंदाजाला चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळायचा होता, पण चेंडू लेग स्टंपच्या लाईनमधून ऑफ स्टंपच्या दिशेने स्विंग झाला आणि स्टंप उडाला. स्पिन झालेल्या चेंडूकडे पाहून फलंदाजदेखील अवाक् झाला. चहलच्या या चेंडूने क्रिकेटप्रेमींना शेन वॉर्नची आठवण करून दिली. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, कौंटी क्रिकेटमध्ये केंटकडून चहलची ही पहिली विकेट होती. त्याने कौंटी क्रिकेटची सुरुवात अतिशय शानदार पद्धतीने केली. नॉटिंगहॅमशायर विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात चहलने ही विकेट घेतली. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस चहलने 20 षटके गोलंदाजी केली होती, ज्यामध्ये त्याने 3 विकेट्स मिळवल्या.