Team India Squad announced for Sri Lanka T20 ODI series: BCCI ने मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी आणि वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या टी२० मालिकेत संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे आहे. या मालिकेत रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांची निवड झालेली नाही. रोहित दुखापतीशी झुंजत आहे. त्यामुळे तो विश्रांती घेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीनेही विश्रांतीसाठी सुटी मागितली आहे. त्याचवेळी केएल राहुल लग्नबंधनात अडकणार आहे, त्यामुळे तो या टी२० मालिकेत खेळणार नाही असे सांगितले जात आहे. वन डे मालिकेत मात्र रोहित शर्माच संघाचा कर्णधार असणार आहे.
हार्दिक पांड्याला टी२० मध्ये कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पांड्याकडे वन डे संघाचे उपकर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. रिषभ पंतला वन डे आणि टी२० या दोन्ही संघातून वगळण्यात आले आहे.
शिवम मावी, मुकेश कुमारला संधी
टी२० विश्वचषकानंतर अनेक गोष्टींची चर्चा रंगली होती. त्यानुसार बोर्ड आता युवा खेळाडूंना संधी देताना दिसतोय. तेच या संघातही पाहायला मिळाले आहे. शुभमन गिल, राहुल त्रिपाठी यांना संघात स्थान दिले आहे. त्याच्याशिवाय युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीलाही संधी मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वन डे मालिकेत संघात निवड झालेल्या मुकेश कुमारलाही टी२० मालिकेतही संधी मिळाली.
काही काळापूर्वी रोहितच्या अनुपस्थितीत वन डे संघाचे नेतृत्व करणारा डावखुरा फलंदाज शिखर धवन याला वनडे संघातून वगळण्यात आले आहे. रोहित शिवाय गिल आणि इशान किशन हे आणखी दोन सलामीवीर संघात आहेत. सूर्यकुमार यादवचे वन डे संघात पुनरागमन झाले आहे. बांगलादेश दौऱ्यावर तो खेळला नव्हता.
भारताचा टी२० संघ- हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
भारताचा वन डे संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.