Hong Kong Cricket Sixes 2024 : हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस २०२४ साठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. रॉबिन उथप्पाच्या नेतृत्वात टीम इंडिया असेल. मराठमोळ्या केदार जाधवला देखील संधी मिळाली आहे. १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाईल. हाँगकाँग क्रिकेटने आयोजित केलेल्या या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होणार आहेत. शेवटच्या वेळी २०१७ मध्ये या स्पर्धेचा थरार रंगला होता, मात्र आता पुन्हा सात वर्षांनी ही अनोखी स्पर्धा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. भारताने या स्पर्धेचे शेवटचे विजेतेपद २००५ मध्ये जिंकले होते.
हाँगकाँग सुपर सिक्सेस स्पर्धेसाठी भारतीय संघात सात खेळाडूंना संधी मिळाली आहे. यामध्ये रॉबिन उथप्पा, केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, मनोज तिवारी, शाहबाज नदीम, भरत चिपली आणि श्रीवास्तव गोस्वामी यांचा समावेश आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, हाँगकाँग, नेपाळ, न्यूझीलंड, ओमान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती हे १२ संघ या स्पर्धेत खेळणार आहेत.
दरम्यान, हाँगकाँग सुपर सिक्सेस स्पर्धेतील सामने १ ते ३ नोव्हेंबर या तीनही दिवशी सकाळी ८.३० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत खेळवले जातील. या स्पर्धेला आयसीसीची मान्यता आहे. यष्टीरक्षक वगळता सर्वच खेळाडूंना किमान एक षटक टाकायचे असते. त्यामुळे अष्टपैलूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची असते. इंग्लंडने सर्वाधिक पाचवेळा या स्पर्धेचा किताब जिंकला आहे. विशेष बाब म्हणजे सहा-सहा खेळाडूंच्या दोन संघांमध्ये लढत होते. पाच-पाच षटकांचा सामना असतो. खरे तर अंतिम सामन्यातील एका षटकात आठ चेंडू टाकले जातात. जर एका फलंदाजाने ३१ धावा केल्यास त्याला रिटायर्ड हर्ट म्हणून तंबूत परतावे लागते. पण, सर्व खेळाडू बाद झाल्यास त्याला पुन्हा फलंदाजी करण्याची मुभा असते. हाँगकाँग क्रिकेट सिक्सेसचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केले जातील. भारताचा सलामीचा सामना एक नोव्हेंबर रोजी पाकिस्तानसोबत आहे.
भारताचा संघ -रॉबिन उथप्पा (कर्णधार), भरत चिपली, केदार जाधव, मनोज तिवारी, शाहबाज नदीम, श्रीवास्तव गोस्वामी, स्टुअर्ट बिन्नी.