Team India Injury: भारतीय संघ सध्या आफ्रिकेविरूद्धच्या टी२० मालिकेची तयारी करत आहे. ९ जूनपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. त्यासोबतच देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी सुरु आहे. याच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध कर्नाटकला मोठा धक्का बसला. संघाचा सलामीवीर मयंक अग्रवाल गंभीर जखमी झाला असून, त्यानंतर तो मैदानावरच वेदना असह्य होत असल्याने झोपला. अग्रवालची आफ्रिकेविरूद्ध टी२० मालिका आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात निवड झालेली नव्हती. पण रोटेशन पॉलिसीनुसार, त्याचा लवकरच संघात नंबर लागणार आहे. त्यामुळे अशा वेळी त्याची दुखापत टीम इंडियासाठी धक्काच मानली जात आहे.
कशी झाली दुखापत?
ही घटना सामन्याच्या सातव्या षटकात घडली. शिवम मावी पहिले षटक टाकण्यासाठी आला. मावीने शेवटचा चेंडू शॉर्ट पिट टाकला. त्यावर मयंक अग्रवाल पूर्णपणे गोंधळला. चेंडू आधी त्याच्या हाताला लागला आणि नंतर बरगड्यांना लागला. चेंडू अंगावर आदळल्यानंतर तो वेदनेने ओरडताना दिसला. यानंतर फिजिओ मैदानावर आले आणि मयंकवर उपचार केले. मयंकने फलंदाजी सुरूच ठेवली, पण नंतर तो फार काही करू शकला नाही आणि १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
IPLमध्येही असंच घडलं होतं...
IPL 2022 मध्ये देखील सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या साखळी सामन्यात उमरान मलिकच्या चेंडूवर मयंक अग्रवाल जखमी झाला होता. त्या सामन्यात उमरानने मयंकचे स्वागत शॉर्ट पिच बाऊन्सने केले. तेव्हा मयंकला चेंडू समजला नाही आणि चेंडू त्याच्या बरगडीला लागला. त्या चेंडूवर मयंकने कशी तरी लेग बायची धाव घेतली होती, पण दुखण्यामुळे तो नंतर खेळपट्टीवर पडून राहिला.
टीम इंडियासाठी धक्का
मयंक अग्रवालच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात. मयंक सध्या संघाबाहेर असला तरी त्याच्या कामगिरीवर प्रत्येक क्षणी निवड समितीची नजर आहे. मयंक अग्रवालने आतापर्यंत १६ कसोटी सामन्यांमध्ये ४३.३० च्या सरासरीने १ हजार ४२९ धावा केल्या. या दरम्यान मयंकने ४ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली आहेत. मयंकची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या २४३ आहे.
Web Title: Team India Star Batman injured as ball hit on his head and ribs while batting Mayank Agarwal collapsed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.