Join us  

दिसतं तसं नसतं! प्रेमात हरूनही 'जग' जिंकलं; हार्दिकच्या संयमाला नक्की काय म्हणायचं?

hardik pandya and natasa stankovic divorce : असह्य वेदनांचा सामना करून यशाचे शिखर गाठणारा हार्दिक पांड्या.

By ओमकार संकपाळ | Published: July 19, 2024 1:53 PM

Open in App

hardik pandya and natasa news : वेळ बदलतेच... कालची वेळ आज राहत नाही ना आजचा दिवस उद्या असतो. वेळ बदलायला फार वेळ लागत नाही असं म्हणतात. याचं ताज उदाहरण म्हणजे हार्दिक पांड्या... आयपीएल २०२४ मध्ये चाहत्यांनी किंबहुना अतिउत्साही 'रिल'बाज मंडळीने हार्दिकवर टीका करण्यात कोणतीच कसर सोडली नाही... कोण छपरीच म्हणेल तर कोणी गद्दारीचा शिक्का मारायला सुरुवात केली. मुंबईत वानखेडेवर सामना म्हटलं की या हुल्लडबाज तरुणांची दिवाळीच असायची. हार्दिकला ट्रोल करण्यासाठी एकही संधी न सोडणारी मंडळी आज त्याच्यासाठी भावुक झाल्याचे दिसते. याला नक्की काय म्हणायचं? असा प्रश्न उद्भवतो. काही महिन्यांतच हार्दिकसाठी हितचिंतक बनलेल्या मंडळीचं एकमेव कारण म्हणजे पांड्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच... होय, गुरुवारी रात्री श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली अन् अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष सूर्यकुमार यादव या नावानं वेधलं. त्यामागील कारण म्हणजे हार्दिक पांड्याच. भारताच्या ट्वेंटी-२० संघाची धुरा सांभाळणाऱ्या पांड्यावर कर्णधारपद तर सोडाच उपकर्णधारपदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली नाही. नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीरच्या आगमनाने भारतीय क्रिकेटमध्ये नवा 'सूर्यो'दय झाला. परंतु, त्याच्या पुढच्या काही वेळातच क्रिकेट वर्तुळाला धक्का देणारी बातमी धडकली. हार्दिकने पत्नी नताशापासून वेगळे होत असल्याचे जाहीर केले अन् एकच खळबळ माजली.

आयपीएल २०२४ चा हंगाम हार्दिकसाठी जणू काही काळ रात्रंच... या काळ रात्रीत स्टार अष्टपैलू खेळाडूने अनेक घाव झेलले. पण, संयमाने हार्दिकने याचा सामना करत ट्वेंटी-२० विश्वचषकात मात्र जग जिंकलं. आता हार्दिकप्रती प्रत्येकाच्या मनात सहानुभूती असणं साहजिकच आहे. एकदा नव्हे तर तीनदा लग्न करून हार्दिकने चाहत्यांना अवाक् केले. तेव्हा हार्दिकवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. अनेकांनी त्याच्या पैशांपर्यंत बोलण्याची मजल मारली. पण, टीकाकारांकडे दुर्लक्ष करणारा पांड्या तसाच पुढे प्रवास करत राहिला. ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने जी कामगिरी केली ती ऐतिहासिकच. प्रेमात हरूनही जग जिंकण्यापर्यंतचा हार्दिकचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्या वेदना, आठवणी, व्यथा काय असतील याबद्दल तोच स्पष्ट सांगू शकतो. हार्दिक-नताशा वेगळे झाले आहेत हे कळताच चाहत्यांना विश्वचषकाची आठवण झाली. भारताने विश्वचषक जिंकताच हार्दिकला रडू कोसळले. यामागचे कारण गुरुवारी स्पष्ट झाले. 

हार्दिकने घटस्फोटाची माहिती देतानाही मनातली खदखद बोलून दाखवली. आम्ही हे नाते वाचवण्यासाठी खूप काही प्रयत्न केले असल्याचे त्याने आवर्जुन सांगितले. यावरून हार्दिकच्या वेदना आणि त्याला होत असलेला त्रास प्रकर्षाने जाणवतो. हार्दिक आणि नताशा यांना अगस्त्यच्या रूपात वारस लाभला. आता त्याचा सांभाळ कोण करणार, तो कोणाकडे राहणार अशी बरीच चर्चा रंगली आहे. मात्र, या क्षणी हेच म्हणावे लागेल की, हार्दिकच्या संयमाला मात्र तोड नाही. अलीकडेच मुंबईत पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याला हार्दिकने हजेरी लावली. यावेळी त्याने केलेला डान्स, एखाद्या वरातीत गावाकडची पोरं जशी थिरकतात तसा हार्दिक दिसला. त्यानं अभिनेत्री अनन्या पांडेसोबत बेभान होऊन डान्स केला. याची बरीच चर्चा रंगली मात्र कोणालाच हार्दिकच्या मनातील खदखद जाणवली नाही. किंबहुना त्यानेही आपण प्रेमात हरलो असल्याची भणक कोणालाच लागू दिली नाही. 

वैवाहिक आयुष्यात कलह, आपलं प्रेम हातून जातंय, असह्य वेदनांचा पाऊस, व्यथा त्यात हुल्लडबाज टीकाकारांनी टाकलेले शाब्दिक गोळे... याच पूर्णत: भाजून निघालेला हार्दिक. नाना वेदनांचे आभाळ डोक्यावर असताना त्याने टीम इंडियासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. प्रेमात हरलेल्या अनेकांनी वेगळा मार्ग निवडला. अनेकांचे संतुलन बिघडले... काहींनी तर जीवन संपवण्यापर्यंत विचार केला. अशी अनेक उदाहरणं या समाजात पाहायला मिळतात. परंतु, हार्दिक एक वेगळंच रसायन आहे हे आपल्याला मान्यच करावे लागेल. 

हार्दिकने जड मनाने नताशापासून वेगळे होत असल्याची माहिती दिली. त्याची ती पोस्ट अन् सोशल मीडियावर आलेला चर्चेचा पूर. अगदी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला पांड्या प्रेमात हरला अन् टीकाकार हितचिंतक अक्षरक्षः जणू काही कुटुंबीय बनले. हार्दिकने केलेली पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत गेली. त्याने कमेंट सेक्शन बंद केल्यानं कोणालाच त्याविषयी तिथं व्यक्त होण्याची संधी नव्हती. कदाचित याबद्दल काहीही वाईट अथवा आपल्या नात्याला आणखी डाग लागेल याबद्दल ऐकण्याची किंवा वाचण्याची मानसिकता नसावी. म्हणूनच हार्दिकने काही चारोळ्या लिहित जड मनाने आपल्या व्यथा मांडल्या आणि नात्याला पूर्णविराम मिळाला असल्याची बातमी पोहोचवली. 

चार वर्षे सोबत राहिल्यानंतर नताशा आणि मी वेगळे होत आहोत. हे नाते वाचवण्यासाठी आम्ही जे शक्य होते ते करण्याचा प्रयत्न केला. पण आता आम्हा दोघांसाठी हाच योग्य निर्णय आहे असे आम्हाला वाटते. हा खूप कठीण निर्णय होता. एकत्र घालवलेले क्षण आणि परस्परांचा आदर करत कुटुंब म्हणून वाटचाल केली, अशा शब्दांत हार्दिकने घटस्फोटाची माहिती दिली. एकूणच हार्दिकने मांडलेल्या या चारोळ्या सर्वकाही सांगून जातात. विशेष बाब म्हणजे हार्दिकने केलेल्या उल्लेखामुळे चाहत्यांना नताशावर टीका करण्याची आयती संधी मिळाली. 'आम्ही खूप प्रयत्न केला पण हा योग्य निर्णय' हे हार्दिकचं वाक्य त्याच्यात असलेल्या अनोख्या संयमाचं रसायनच असल्याचे दिसते. 

हार्दिक पांड्याच्या वैवाहिक आयुष्यात सर्वकाही ठीक नसल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू होती. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या तोंडावर या चर्चेने जोर धरला. मग काय नुकतीच आयपीएल संपल्याने हार्दिकवर चाहत्यांचा रोष ताजाच होता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिकची निराशाजनक कामगिरी आणि रोहितबद्दल घेतलेले काही निर्णय अनेकांना पटले नाहीत. मात्र, रोहित शर्माने वेळोवेळी हार्दिकची साथ देत त्याला नकळत धरी देण्याचा प्रयत्न केला. भारत विश्वविजेता होताच हार्दिक ढसाढसा रडला... तितक्यात कर्णधार रोहितने हार्दिकचे चुंबन घेतले... खरे तर या स्पर्धेच्या आधीपासूनच हार्दिकच्या वैवाहिक आयुष्यात वादळ होते. तरीदेखील अशा कठीण परिस्थितीत त्याने खेळावर लक्ष केंद्रित करत आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्यात मोठे योगदान दिले. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्यात असलेला संयम, जिद्द, चिकाटी आणि वेदनांमुळे पोटात आलेला गोळा... यांना चीतपट करून पांड्याने आपण वेगळेच रसायन असल्याचे दाखवून दिले हे नक्कीच.  

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिचऑफ द फिल्डभारतीय क्रिकेट संघप्रेरणादायक गोष्टी