Join us  

प्रतिष्ठा राखण्यास टीम इंडिया प्रयत्नशील; ऑस्ट्रेलिया ३-० ने विजय मिळविण्यात यशस्वी ठरला तर...

तिसरा वन-डे : सैनीच्या स्थानी नटराजन किंवा शार्दुलला मिळू शकते संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 4:43 AM

Open in App

कॅनबरा : पहिल्या दोन लढतींमध्ये एकतर्फी पराभव स्वीकारणारा भारतीय संघ बुधवारी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या व अंतिम वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात गोलंदाजी आक्रमणामध्ये बदल करणार असल्याचे जवळजवळ निश्चित आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्या मालिकेत क्लीन स्विप टाळण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

ऑस्ट्रेलिया ३-० ने विजय मिळविण्यात यशस्वी ठरला तर सलग दुसऱ्या मालिकेत भारताचा सफाया होईल. कारण यंदा वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडनेही भारताचा ३-० ने पराभव केला होता. पहिल्या दोन सामन्यांत खोऱ्याने धावा फटकावल्या गेल्या. त्यात ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवताना विराट कोहलीच्या संघाविरुद्ध सहज विजय नोंदवले. भारतीय संघ मनुका ओव्हलमध्ये विजय मिळविण्यात यशस्वी ठरला तर टी-२० मालिकेपूर्वी आत्मविश्वास उंचावण्यास मदत होईल. 

कर्णधार कोहलीने पूर्वीच कबूल केले आहे की ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन सामन्यांत आमच्यावर वर्चस्व गाजवले. विजयाच्या शोधात भारत संघात काही बदल करण्याची शक्यता आहे.  प्रथमच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेला भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आतापर्यंत अचूक लाईन व लेंथवर गोलंदाजी करण्यात अपयशी ठरला आणि यजमान संघाने त्याच्याविरुद्ध सहज धावा वसूल केल्या. सैनीने ७ षटकांत ७० धावा बहाल केल्यानंतर कोहलीला हार्दिक पांड्या व मयंक अग्रवाल यांच्यासारख्या गोलंदाजांकडून त्याचा स्पेल पूर्ण करावा लागला. पांड्या गोलंदाजीमध्ये अद्याप पूर्णपणे फिट नाही तर अग्रवाल नियमित गोलंदाज नाही. 

भारतीय कर्णधाराला सामन्यादरम्यान आपल्या गोलंदाजांना रोटेट करण्याच्या रणनीतीवर टीकेला सामोरे जावे लागले आहे. गौतम गंभीर व आशीष नेहरा या माजी क्रिकेटपटूंनी मुख्य गोलंदाज बुमराहला केवळ दोन षटकांचा स्पेल देण्यावर टीका केली आहे. वेगवान गोलंदाज महागडे ठरत असताना फिरकीपटूंच्या अपयशामुळे भारताच्या अडचणींमध्ये भर घातली आहे. युजवेंद्र चहल पहिल्या दोन सामन्यांत सर्वांत महागडा गोलंदाज ठरला. त्याने १९ षटकांत १६० धावा बहाल केल्या व केवळ एक बळी घेतला. रवींद्र जडेजाने धावगतीवर काहीअंशी लगाम घातला, पण त्याला एकही बळी घेता आला नाही. फलंदाजांबाबत विचार करता कोहली व लोकेश राहुल दुसऱ्या सामन्यांत फॉर्मात दिसले, पण राहुल दुसऱ्या पॉवर प्ले दरम्यान स्ट्राईक रोटेट करण्यात अपयशी ठरला, हा चिंतेचा विषय आहे. सर्वसाधारणपणे भारतीय फलंदाज दोन्ही सामन्यांत बरी कामगिरी करण्यात यशस्वी ठरले, पण गोलंदाजांची कामगिरी सुधारली तर पाहुण्या संघाला संधी मिळू शकते. 

उभय संघांची निवड यातून होणार

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर आणि टी. नटराजन.

आस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), डार्सी शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, एलेक्स केरी, मिशेल स्टार्क, एडम जम्पा, जोश हेजलवुड, सीन एबट, एश्टन एगर, कॅमरन ग्रीन, मोइजेस हेन्रिक्स, ॲण्ड्य्रू टाय, डॅनियल सॅम्स आणि मॅथ्यू वेड. 

तिसऱ्या व अंतिम वन-डेमध्ये जर शार्दुल ठाकूर किंवा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन यांच्यापैकी एकाला संधी मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. शार्दुलकडे २७ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे तर नटराजन यॉर्कर टाकण्यात माहीर आहे. कोहलीने कसोटी मालिकेपूर्वी बुमराह व शमी यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला तर शार्दुल व नटराजन या दोघांनाही खेळण्याची संधी मिळू शकते. या मालिकेत भारतीय गोलंदाज फॉर्मात नसल्याचे दिसून आले. त्यांच्याविरुद्ध ६९ चौकार व १९ षटकार ठोकल्या गेले. कोहली म्हणाला, ‘टी-२० क्रिकेटमधून वन-डे क्रिकेटमध्ये परतण्याची सबब सांगता येणार नाही. कारण गेल्या अनेक दिवसांपासून संघात तेच खेळाडू आहेत.’भारतीय गोलंदाजांसाठी सर्वांत मोठी डोकदुखी ठरलेल्या ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने सलग दोन सामन्यात शतके झळकावली आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये अपयशी ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलनेही आक्रमक फलंदाजी करीत अंतर स्पष्ट केले आहे. भारताचा ६६ व ५१ धावांनी स्वीकारलेला पराभव बघता त्याच्या खेळी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. 

टॅग्स :भारतआॅस्ट्रेलिया