टीम इंडिया क्रिकेटच्या तिन्ही क्षेत्रांत मजबूत

दृष्टिकोन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 06:39 AM2018-11-15T06:39:27+5:302018-11-15T06:39:55+5:30

whatsapp join usJoin us
Team India is strong in all three areas of cricket | टीम इंडिया क्रिकेटच्या तिन्ही क्षेत्रांत मजबूत

टीम इंडिया क्रिकेटच्या तिन्ही क्षेत्रांत मजबूत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चंदू बोर्डे 

ज्या पद्धतीने भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवला, ते पाहता आगामी आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताची तयारी निश्चितच योग्य आणि अचूक पद्धतीने झाली आहे. विंडीजविरुद्ध तिन्ही मालिकांत मिळवलेला विजय खरंच कौतुकास्पद असून सर्वच खेळाडूंनी मिळालेल्या संधीचा फायदा घेतला. विशेष म्हणजे खेळाडूंनी निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवून आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आपण सज्ज असल्याचे सिद्ध केले.

रोहित शर्माने टी२० मालिकेत जबरदस्त नेतृत्व केले, त्यात काहीच वाद नाही. परंतु त्याहून अधिक त्याने अत्यंत प्रभावी फलंदाजी करून लक्ष वेधले. मर्यादित षटकांमध्ये त्याच्यासारखी अफलातून फलंदाजी सध्याच्या घडीला इतर कोणी केली असेल असे वाटत नाही. तो कायम सरळ बॅटने फटके मारत असल्याने त्याची फलंदाजी पाहणे आनंददायी आहे. रोहितचा आत्मविश्वास नेहमी दांडगा असतो, तसेच त्याची फलंदाजी तांत्रिकदृष्ट्या भक्कम आहे. तो असाच खेळत राहिला, तर बरेच विक्रम मोडेल, त्याचबरोबर अनेक विक्रमांची नोंदही करेल. याशिवाय रोहितने डोके शांत ठेवून खंबीर नेतृत्व केले. त्याने जे काही निर्णय घेतले, ते चांगल्या कर्णधाराचे लक्षण आहे. टी२० मालिकेतील प्रत्येक परिस्थिती त्याने शांतपणे हाताळली. गोलंदाजीत त्याने कल्पकतेने बदल केले.
पूर्वीचे विंडीज क्रिकेट आणि आत्ताचे विंडीज क्रिकेट यात खूप मोठा फरक आहे. तिथे तीन दिवसीय किंवा पाच दिवसीय क्रिकेट पाहायला मिळत नाही. त्यामुळे त्यांची तयारी एकदिवसीय किंवा टी२० क्रिकेटसाठी पूरक आहे. शेवटी कसोटी क्रिकेट हेच मोठे आव्हानात्मक असते. त्यापासून तुम्हाला लांब राहता येणार नाही. खेळातील तंत्र, मानसिक नियंत्रण आणि संयम राखून सातत्याने धावा कशा काढाव्यात, हे कसोटी क्रिकेटमध्येच शिकायला मिळते. एकदिवसीय किंवा टी२० क्रिकेटमध्ये आक्रमकतेने वेडेवाकडे फटके मारून धावफलक वेगाने हलता ठेवण्यावर भर दिला जातो. यामुळे डोके शांत ठेवून खेळणे कठीण होऊन जाते. पण या वेगवान क्रिकेटमध्येच विंडीज खेळाडू सहजपणे खेळतात. त्यांच्यातील हीच सहजता कसोटी क्रिकेटमध्ये पाहण्यास मिळत नाही.

 

या मालिकेतील विजयाचा फायदा भारतीय खेळाडूंना आॅस्ट्रेलिया दौऱ्यात नक्कीच होईल. खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावलेला असणार; शिवाय मानसिकदृष्ट्याही भारतीय खेळाडू अधिक सकारात्मकतेने खेळतील. एक प्रकारे ही मालिका आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताला पूर्वतयारीसारखीच होती आणि ती संधी भारताने साधली आहे. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला संभाव्य विजेते मानले जात आहे. त्यांच्या संघात डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ हे दोन प्रमुख खेळाडू नसतील. पण शेवटी प्रतिस्पर्धी संघ आॅस्ट्रेलिया आहे हे विसरता कामा नये. शिवाय मालिका त्यांच्या भूमीवर खेळली जाणार आहे. त्यामुळे घरच्या वातावरणाचा त्यांना फायदा होईलच. त्यामुळेच आॅस्ट्रेलियामध्ये गेल्यावर तिथल्या वातावरणाशी आणि खेळपट्टीशी लवकरात लवकर कसे जुळवून घेता येईल यावर भारताचे यश मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहील. कारण आॅस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर चेंडू अधिक उसळी घेतात.

त्याचप्रमाणे आॅसी संघदेखील पूर्वीसारखा मजबूत राहिला नसल्याने भारताचे पारडे नक्कीच वरचढ आहे. त्यामुळेच तेथील परिस्थितीशी लवकर जुळवून घेण्यात भारताने यश मिळवले तर नक्कीच भारत वर्चस्व गाजवेल. भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी मजबूत आहेच, पण यात भर पडली ती क्षेत्ररक्षणाची. त्यामुळे एकंदरीत भारतीय संघ अत्यंत मजबूत आहे यात शंका नाही.
 

( लेखक माजी क्रिकेटपटू आहेत )

Web Title: Team India is strong in all three areas of cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.