बंगळुरूच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक करून दाखवलं. न्यूझीलंडच्या संघासमोर पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या ४६ धावांत गारद झाली होती. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने सर्व बाद ४०२ धावा करत ३५६ धावांची आघाडी घेतली होती. भारतीय संघाला पाहुण्यांनी अगदी खिंडीत पकडल्याचा हा सीन होता. पण टीम इंडियानं यातून सावरणारी कामगिरी करून दाखवली. पहिल्या डावातील लाजिरवाण्या विक्रमानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात धमाकेदार कमबॅक करत घरच्या मैदानात सुपर कमबॅकचा खास रेकॉर्ड नोंदवला आहे.
मोठ्या पिछाडीवरून आघाडी
भारतीय दुसऱ्या बंगळुरु कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा आणि विराट कोहली आणि सर्फराज खान यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडत तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाला सुस्थितीत आणले होते. चौथ्या दिवसाच्या खेळात सर्फराज आणि रिषभ पंत या जोडीनं चौथ्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी करत ३५६ धावांच्या पिछाडी टीम इंडियाने आघाडीमध्ये बदलून दाखवली.
मायदेशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च कामगिरी
घरच्या मैदानात पाहुण्या संघाविरुद्ध मोठ्या पिछाडीवर असताना आघाडी घेण्याचा खास विक्रम टीम इंडियाने बंगळुरुच्या मैदानात रचला. मायदेशातील टीम इंडियाची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कमबॅक स्टोरी आहे. याआधी भारतीय संघाने १९८५ मध्ये इंग्लंड विरुद्ध चेन्नईच्या मैदानात ३८० धावांची आघाडी भरून काढली होती.
मायदेशात भारतीय संघाने मोठी आघाडी भरून काढल्याची कामगिरी
- ३८० - विरुद्ध इंग्लं, चेन्नई १९८५
- *३५६ - विरुद्ध न्यूझीलंड, बंगळुरु, २०२४
- ३३४ - विरुद्ध श्रीलंका, अहमदाबाद, २००९
- २९३ - विरुद्ध इंग्लंड, कानपूर, १९६४
- २७४ - विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कोलकाता , २००१
- २२९ - विरुद्ध वेस्ट इंडिज, दिल्ली, १९५९
परदेशात भारतीय संघानं मोठी आघाडी भरून काढल्याची कामगिरी
- ३८६ - विरुद्ध इंग्लंड, लीड्स, १९६७
- ३६८ -विरुद्ध इंग्लंड, मँचेस्टर, १९३६
- ३४० - विरुद्ध पाकिस्तान, लाहोर, १९७८-७९
- ३१४ - विरुद्ध न्यूझीलंड, नेपीयर, २००८-०९
- ३०५ - विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स, लंडन, १९५२
भारतीय संघाने मोठी आघाडी भेदली असली तरी हा सामना जिंकायचा असेल तर संघाला किमान १८०-२०० धावांचे टार्गेट सेट करावे लागेल. सर्फराज खान आणि रिषभ पंत यांनी टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढलं. ही जोडी परतल्यानंतर लोकेश राहुलही माघारी फिरल्यामुळे टीम इंडियाच्या ताफ्यात थोडं टेन्शन नक्की असेल. आता रवींद्र जडेजा आणि अश्विनवर मोठी जबाबादीर असेल.
Web Title: Team India Stunning Comeback In Bengaluru Test India erase New Zealand's 356-run lead for their second-highest recovery in Tests at home
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.