Indian team for the T20 World Cup : यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बुधवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. १५ सदस्यीय संघात फिरकीपटूंचाच अधिक भरणा आहे. आर अश्विनची ( R Ashwin) निवड ही सर्वांना आश्चर्यचकित करणारी ठरली. इंग्लंड दौऱ्यावर ज्या अश्विनला चार कसोटीत बाकावर बसवून ठेवले, त्यालाच थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान दिले गेले. भारताच्या संघात चार फलंदाज, दोन यष्टिरक्षक-फलंदाज, १ जलदगती अष्टपैलू, २ फिरकी अष्टपैलू, ३ फिरकीपटू व ३ जलदगती गोलंदाज असणार आहेत. सर्वात मोठी बातमी म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) टीम इंडियाला मार्गदर्शन करणार आहे. तो मेंटर म्हणून भारतीय संघासोबत असणार आहे, अशी घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली. ( Former India Captain MS dhoni to mentor the team for the T20 World Cup, Secretary Jay Shah)
जय शाह यांनी सांगितले की,''दुबईत मी महेंद्रसिंग धोनीसोबत चर्चा केली. ही जबाबदारी पार पाडण्यास त्याची काहीच हरकत नाही आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचा मेंटर म्हणून काम पाहण्यात तो तयार आहे. याबाबत मी कर्णधार विराट कोहली, उप कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबतही बोललो आणि त्यांनाही हा निर्णय पटलेला आहे.''
धोनीनं मागच्या वर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील पहिला व एकमेव कर्णधार आहे. महेंद्रसिंग धोनीनं ९० कसोटींत ४८७६ धावा केल्या आणि त्यात ६ शतकं व ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. ३५० वन डेत १०७७३ धावा आणि त्यात १० शतकं व ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. ९८ ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर १६१७ धावा आहेत.
भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर
Web Title: Team India for T20 World Cup : Former India Captain MS dhoni to mentor the team for the T20 World Cup, say Secretary Jay Shah
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.