मुंबई - भारतीय संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी-२० मालिकेत भारतीय संघाने १-० असा विजय मिळवला होता. तर एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ ०-१ ने पिछाडीवर आहे. दरम्यान, काल झालेला दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता ३० नोव्हेंबर रोजी मालिकेतील निर्णायक सामना होणार आहे. न्यूझीलंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथेही भारतीय संघ ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. मात्र बांगलादेश दौऱ्यात टीम इंडिया पूर्णपणे बदललेली दिसणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेले आठ खेळाडून बांगलादेशमध्ये वनडे मालिकेत खेळताना दिसणार नाहीत. तर नियमित कर्णधार रोहित शर्मासह अनेक सिनियर खेळाडू बांगलादेश दौऱ्यातून संघामध्ये पुनरागमन करणार आहेत.
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचं आव्हान उपांत्य फेरीत संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासह काही सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतून कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, केएल राहुल हे खेळताना दिसणार आहेत. तर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळलेले शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक हे बांगलादेश दौऱ्यात खेळताना दिसणार नाहीत.
मात्र बांगलादेश दौऱ्यासाठी रजत पाटीदार आणि राहुल त्रिपाठी या दोन युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांनीही देशांतर्गत स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. तर रिषभ पंतसोबत इशान किशन खेळताना दिसणार आहे. तर वेगवान गोलंदाज कुलदीप सेन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिसू शकतो. तर फिरकीची मदार अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज अहमदवर असेल. भारत आणि बांगलादेश यांच्यात ४, ७ आणि १० डिसेंबर रोजी खेळवले जातील. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामनेही खेळवले जातील.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा एकदिवसीय संघरोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, शिखर धवन, विराट कोहली. रजत पाटिदार, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप सेन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.