Join us  

सगळं श्रेय रोहित शर्माचं; गंभीरचं कौतुक करणं म्हणजे उच्चप्रतीची 'चाटुगिरी'- सुनील गावसकर

Sunil Gavaskar on Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs BAN 2nd Test: भारताने बांगलादेश विरूद्धची दुसरी कसोटी अवघ्या दोन दिवसांच्या खेळात जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 1:02 PM

Open in App

Sunil Gavaskar on Rohit Sharma, IND vs BAN 2nd Test: बांगलादेश विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एक वेगळीच रणनीती वापरली. तीन दिवसांचा खेळ वाया गेल्यावर अखेरच्या दोन दिवसात सामन्याचा निकाल लागणे अनेकांना अशक्य वाटत होते. पण भारताने आधी बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांत आटोपला. त्यानंतर टी२० सारखी फलंदाजी करत अवघ्या ३४.४ षटकांत ९ बाद २८५ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर पुन्हा बांगलादेशला १४६ धावांत गुंडाळले आणि ९५ धावांचे आव्हान पार करत सामना जिंकला. रोहितच्या या रणनीतीवर भारताचे लिटल मास्टर सुनील गावसकर खुश झाले. त्यांनी रोहितचे तोंडभरून कौतुक केले. पण त्यासोबत गौतम गंभीरला या विजयाचे श्रेय देणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला.

गंभीरला श्रेय देणं म्हणजे 'चाटुगिरी'

"इंग्लंडच्या संघाने कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्युलमच्या मार्गदर्शनाखाली नव्या पद्धतीचे कसोटी क्रिकेट सुरु केले. पण रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा आक्रमक खेळ गेल्या दोन वर्षांपासून खेळतो आहे. तो गेल्या अनेक सामन्यांमध्ये आक्रमक फलंदाजी करत आहे आणि आपल्या सहकाऱ्यांनाही प्रेरणा देत आहे. गंभीर मात्र फक्त दोन महिन्यांपासून संघाचे मार्गदर्शन करतोय. त्यामुळे या विजयाचे श्रेय गंभीरला देणे म्हणजे उच्चप्रतीचे लांगुलचालन आहे. मक्क्युलम ज्या आक्रमकतेने फलंदाजी करायचा तशी फलंदाजी गौतमने फार क्वचितच केली असेल. त्यामुळे या विजयाचे श्रेय कुणाला द्यायचे असेल तर ते फक्त आणि फक्त रोहित शर्मालाच द्यायला हवे. त्याच्यामुळेच हे शक्य झाले," अशा शब्दांत सुनील गावसकर यांनी आपले रोखठोक मत मांडले.

पुढे काय होईल ते काळच सांगेल...

"भारतीय संघाला कल्पना आहे की येत्या काळात त्यांच्या कसोटी मालिका तुल्यबळ संघांशी आहेत. त्यामुळे भारताने आताच्या मालिकेत जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न केला. बांगलादेश विरूद्ध दमदार विजय मिळवून झाला. आता भारताची झुंज न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीशी असेल. बांगलादेश विरूद्ध भारताने जी किमया केली, तीच किमया न्यूझीलंडविरूद्धही जमेल का... याचे उत्तर लवकरच मिळेल," असेही गावसकर म्हणाले.

अशी रंगली दुसरी कसोटी

दुसऱ्या कसोटी मोमीनुल हकच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने सर्वबाद २३३ धावा केल्या. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. सलामीवीर यशस्वी जैस्वालने ७२ (५१), केएल राहुल ६८ (४३), विराट कोहली ४७ (३५) आणि रिषभ पंत ३९ (३६) या चौघांच्या दणकेबाज खेळींच्या जोरावर भारताने ३४.४ षटकात ९ बाद २८५ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव १४६ धावांत आटोपला. बुमराह, अश्विन, जाडेजाने ३-३ बळी घेतले. अखेर चौथ्या डावात मिळालेले ९५ धावांचे आव्हान भारताने यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकाच्या जोरावर ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशसुनील गावसकररोहित शर्मागौतम गंभीर