- अयाज मेमन
(कन्सल्टिंग एडिटर )
रोहित शर्मा तंदुरुस्त आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत संघाचे नेतृत्व करण्यासाठी तो सज्ज असेल ही भारतीय क्रिकेटसाठी सर्वात आनंददायी बातमी म्हणावी लागेल. द. आफ्रिका दौरा सुरु होण्याआधी कर्णधार असलेल्या रोहितला सरावादरम्यान दुखापत झाल्यामुळे दौऱ्यास मुकावे लागले होते. त्याने गेली काही आठवडे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅबमध्ये घालवीत स्वत:ला सज्ज केले आहे.
पुनरागमनामुळे मोठा दिलासा
निर्धारित वेळेत रोहित ठराविक चाचण्या उत्तीर्ण होईल का, याबाबत अनिश्चितता होती. तथापि रोहित फिटनेसच्या अडथळ्यातून बाहेर पडला. यामुळे निवडकर्ते आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना द. आफ्रिकेच्या निराशादायी दौऱ्यानंतर रोहितच्या पुनरागमनामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. विराट आणि बीसीसीआय यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे रोहितला झटपट क्रिकेटमध्ये नेतृत्व सांभाळताना अडचणी जाणवतील, अशी चर्चा होती, पण रोहितच्या नेतृत्वाला सर्व स्तरातून मान्यता लाभली हेदेखील खरे.
रोहित-द्रविड यांची वाढली जबाबदारी...
रोहितसाठी खडतर प्रवास आता कुठे सुरू झाला आहे. भारतीय क्रिकेट सध्या पराभवाच्या खाईत लोटले असून, आंतरराष्ट्रीयस्तरावर लौकिक कायम करण्यासाठी संघात स्थिरता आणण्याची जबाबदारी रोहितच्या खांद्यावर असेल. संघाची स्थिती डळमळीत असल्याची साक्ष तिन्ही फॉर्मेटमधेल आकडेवारीवरून पटते. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावरून तिसऱ्या स्थानी घसरला. वन डे मध्ये संघ चौथ्या स्थानावर आला, तर टी-२० क्रमवारीत दुसरे स्थान आहे. टी-२० विश्वचषकात आपला संघ बाद फेरीसाठीदेखील पात्र ठरला नव्हता, हे येथे लक्षात घ्यावे लागेल. ही परिस्थिती संपविण्यासाठी निवडकर्त्यांसह रोहित आणि द्रविड यांना फार मेहनत घ्यावी लगेल. विंडीजविरुद्ध मालिकेत वन डे आणि टी-२० संघात खेळाडूंना संधी देताना सर्वोत्तम संतुलन साधणे आणि अपेक्षेनुरूप बदल करण्याचे कसब दाखवावे लागेल. प्रशिक्षक आणि कर्णधाराला आगामी टी-२० विश्वचषक आणि वन डे विश्वचषकाआधी संघबांधणी करण्यासाठी कमी वेळेत विवेकपूर्ण कामाद्वारे कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.
आश्वासक नेतृत्व
रोहितच्या नेतृत्वास लाभलेली विश्वासार्हता उत्कृष्ट अशी आहेच शिवाय त्याच्या नेतृत्वात मिळालेले आंतरराष्ट्रीय तसेच आयपीएल विजेतेपद रोहितच्या शिरपेचात तुरा रोवणारे ठरतात. या भूमिकेत त्याने स्वत:मधील परिपक्वता आणि डावपेचांची जाणीव याचा परिचय करुन दिला. रोहितमधील अफाट अनुभवाचे प्रतिबिंब देखील दिसून आले आहे. याशिवाय फलंदाजीतील त्याचा फॉर्म कर्णधार पदावर वर्णी लावण्यास कारणीभूत ठरला आहे.
कसोटीचेही नेतृत्व सोपवा
२०२३ ला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होईल. भारत याआधी पहिल्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात खेळला होता. सध्याच्या गुणतालिकेत संघ पाचव्या स्थानावर असून, कसोटीत प्रगती करण्यासाठी काही प्रश्नांची उकल होणे गरजेचे आहे. मात्र तरीही कर्णधाराची निवड का पुढे ढकलण्यात आली, याचे मला आश्चर्य वाटते. रोहित द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी संघाचा उपकर्णधार होता. त्यामुळे विराटकडून नेतृत्वाचा पदभार स्वीकारणे हा तर्कसंगत पर्याय ठरतो. कोहली कसोटी कर्णधार असताना वेगळ्या फॉर्मेटमध्ये वेगवेगळे कर्णधार हे मॉडेल चर्चेत होते, पण विराटच्या राजीनाम्यानंतर या पर्यायावर कठोर मर्यादा आल्या. अनुभव आणि क्षमता असलेले खेळाडू उपलब्ध नाहीत, असे कारण देण्यात येत आहे. तथापि, रोहितमध्ये सर्व आवश्यकता पूर्ण करणारे गुण आहेत. तो बऱ्याच काळापासून संघासोबत असल्याने बलस्थाने आणि उणिवा याची त्याला चांगली कल्पनादेखील आहे. तथापि, दुखापतीमुळे आणि फिटनेसची अडचण असल्याने निवडकर्ते त्याची बाजू घेण्यास टाळाटाळ करीत असावेत.
नंबर वन बनण्याचे आव्हान
साहजिकच, ज्या संघात कर्णधार नियमितपणे खेळत नाही, तो संघ अस्थिर आणि असुरक्षित मानला जातो. रोहित तर वन डे आणि टी-२० संघाचा कर्णधार आहे. अशा वेळी टी-२० विश्वचषक, वन डे विश्वचषक, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आदी स्पर्धां जिंकण्याचे कसब त्याला दाखवणे क्रमप्राप्त ठरेल. त्याच्या नेतृत्वात यंदाचे वर्ष आणि २०२३ हा महत्त्वाचा कालावधी ठरणार आहे. पुढील २४ महिने सामन्यांसाठी तंदुरुस्त असणे, सकारात्मक निकाल देणे तसेच सहकाऱ्यांना प्रेरणा देण्याची जबाबदारीदेखील रोहितवरच असेल.
Web Title: Team India: The responsibility of ending the fight on Rohit's shoulders
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.