Team India Cricket Career: भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऐतिहासिक मालिका विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा स्टार खेळाडू आता पुन्हा टीम इंडियाकडून क्रिकेट खेळताना दिसणार नाही. एका वृत्तानुसार, वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) वन डे आणि टी२० साठी निवडसमितीच्या विचारकक्षेत नव्हताच. पण आता त्याची कसोटी कारकीर्द संपुष्टात आली आहे. टीम इंडिया व्यवस्थापनाने या खेळाडूला यासंबंधीची कल्पना दिलेली आहे. तसेच ४ मार्चपासून मोहाली येथे सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्याची निवड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऋषभ पंत हा संघ व्यवस्थापनाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक आहे. इतके दिवस वृद्धिमान साहा हा संघाचा 'बॅक-अप किपर' होता. पण आता एका वेगळ्याच खेळाडूला संघात बॅकअप किपर म्हणून संघात करून घेतलं जाणार आहे.
वृद्धिमान साहाबद्दल BCCI ची भूमिका नक्की कशी आहे याची माहिती असलेल्या बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितलं की, संघ व्यवस्थापनातील काही उच्चपदस्थ लोकांनी वृद्धिमानला स्पष्टपणे कळवलं आहे की त्याला यापुढे संघात संधी मिळणं कठीण आहे. ऋषभ पंतसोबत काही नवीन बॅक-अप पर्याय तयार करायचे आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेशचा केएस भरत याचा विचार करण्यात येत आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटीत चमकदार कामगिरी केली होती. श्रीलंका कसोटी मालिकेसाठी वृद्धिमानची निवड केली जाणार नाही असेही त्याला स्पष्ट करण्यात आले आहे. कारण आता केएस भरतला वरिष्ठ संघासोबत जास्तीत जास्त अनुभव मिळावा असा विचार संघ व्यवस्थापन करत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक दौऱ्यावर बजावली होती महत्त्वाची भूमिका
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील २०२०-२१ च्या कसोटी मालिकेत भारताच्या विजयात वृद्धिमान साहाचाही वाटा होता. पहिल्या दोन कसोटीनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत होती. त्यावेळी तिसऱ्या कसोटीत ऋषभ पंत फलंदाजी केल्यानंतर जायबंदी झाला. अशा वेळी वृद्धिमान साहाने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात अप्रतिम यष्टीरक्षण केले. त्याने चार झेल घेत मोठा वाटा उचलला. त्याने क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारल्यामुळेच ऋषभ पंतला पुरेशी विश्रांती मिळाली आणि त्याला फिट व्हायला वेळ मिळाला. त्या मालिकेत पंतकडून फारसे चांगले यष्टीरक्ष होत नव्हते त्यामुळे सोशल मीडियावर अशी चर्चाही रंगली होती की भारत फलंदाजीसाठी पंत आणि यष्टीरक्षणासाठी साहा असा प्लॅन करून आला आहे.
साहा रणजी ट्रॉफीही खेळणार नाही
वृद्धिमान साहा रणजी ट्रॉफीमध्येही खेळणार नाहीये. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कदाचित याच एका कारणामुळे वृद्धिमान साहाने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (CAB) अध्यक्ष अभिषेक दालमिया आणि संयुक्त सचिव स्नेहाशिष गांगुली यांना 'वैयक्तिक कारणांमुळे' या मोसमात आपण रणजी ट्रॉफी खेळणार नसल्याचे कळवले आहे. याच कारणामुळे निवडकर्त्यांनीही त्याची निवड केलेली नाही.
साहाचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट करियर
वृद्धिमान साहाने भारतासाठी ४० कसोटीत तीन शतकांच्या मदतीने १ हजार ३५३ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी ३० पेक्षा कमी होती. पण यष्टीरक्षक म्हणून त्याने चांगली कामगिरी केली. त्याच्या नावे ९२ झेल आणि १२ स्टंपिंग असे यष्टीरक्षण करताना एकूण १०४ बळी आहेत.