Join us  

टीम इंडियाने ओव्हलवर गाळला घाम! पहिल्याच सत्रात केला तीन तास कसून सराव 

स्लिपमध्ये झेल टिपण्यावर दिला भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2023 9:34 AM

Open in App

- अभिजित देशमुख

लंडन :  केंट क्रिकेट मैदान आणि अरुंडेल कॅसल येथे काही दिवस सराव केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ शनिवारी लंडनला रवाना झाला. संघाचे पहिले सराव सत्र लंडनमधील केनिंग्स्टन ओव्हल क्रिकेट मैदानावर झाले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ ते ११ जून  या कालावधीत होणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनलआधी रविवारी सकाळी तब्बल तीन तास सर्वच खेळाडूंनी घाम गाळला. कोच राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफच्या उपस्थितीत खेळाडूंनी वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग केले. यादरम्यान काही खेळाडूंनी मैदानावर धावण्याचा व्यायाम केला.

भारतीय संघातील खेळाडूंची सहा गटात विभागणी करण्यात आली होती. सर्वांना झेल टिपण्याचा सराव देण्यात आला. स्लिपमध्ये झेल घेण्याचा सराव मोजक्या खेळाडूंना देण्यात आला. त्यात के. एस. भरत हा यष्टिरक्षकाच्या भूमिकेत होता. पहिल्या स्लिपमध्ये चेतेश्वर पुजारा, दुसऱ्या स्लिपमध्ये विराट कोहली, त्यानंतर शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणे यांना उभे करीत हा सराव देण्यात आला.

यानंतर नेटमध्ये सराव सुरू झाला. विराट, रोहित शर्मा, गिल आणि पुजारा यापैकी प्रत्येकाने सुरुवातीला ३०-३० मिनिटे फलंदाजी केली. विशेष म्हणजे वेगवान गोलंदाज उमेश यादवनेदेखील फलंदाजीचा सराव केला. दुसरा यष्टिरक्षक- फलंदाज ईशान किशन याने सर्वांत दीर्घवेळ फलंदाजीचा सराव केल्यामुळे अंतिम एकादशमध्ये यष्टिरक्षणासाठी ईशान संघ व्यवस्थापनाची प्रथम पसंती असेल का, अशी शंका उपस्थित होत आहे. ईशानने आज यष्टिरक्षणाचा मात्र सराव केला नाही.

ऑस्ट्रेलिया संघात डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांचा समावेश असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय संघ व्यवस्थापनाने अनिकेत चौधरी याचा नेट बॉलर म्हणून वापर  करण्याचे ठरविले आहे. याशिवाय डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट हा भारतीय संघात आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा या संघातील सर्वच प्रमुख गोलंदाजांनी बराचवेळ नेटमध्ये गोलंदाजीचा सराव केला.

ओव्हलवर भारताचा रेकॉर्ड खराब...

द ओव्हलवर भारताचे रेकॉर्ड फारच खराब आहे. येथे भारताने १४ सामने खेळले असून, त्यापैकी दोनच जिंकले. पाच सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला आहे. अशावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोटात आनंद व्यक्त होत असेल. दुसरीकडे २०२१ ला इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना मात्र भारताने याच मैदानावर जिंकला होता.

इशानच्या डाव्या हाताला दुखापत

रविवारी सकाळी भारतीय संघाने जोरदार सराव केला. या सरावादरम्यान यष्टीरक्षक इशान किशनच्या डाव्या हाताला दुखापत झाली. सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याने इशानच्या हातावर बँडेज बांधले. इशानने सर्वाधिक काळ फलंदाजीचा सराव केला. डावखुरा इशान दोन बॅट घेऊन मैदानावर उतरला होता. दुखापत झाल्यावर तो तत्काळ पॅव्हेलियनमध्ये परतला.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ
Open in App