Team India Day Night Test: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका २-१ ने गमावली. पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेऊनही भारताला पुढचे दोन्ही सामने गमवावे लागले. आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर आता भारत वेस्ट इंडिजचा पाहुणचार करण्यास सज्ज आहे. विंडिजचा संघ ६ फेब्रुवारीपासून ३ वन डे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत कसोटी सामन्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. पण BCCI मात्र टीम इंडियासाठी पुन्हा एकदा डे नाईट टेस्ट म्हणजे दिवस रात्र पद्धतीच्या गुलाबी चेंडू कसोटी सामन्याचं प्लॅनिंग करत आहे. श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर असताना ही कसोटी खेळवली जाईल, असं सध्या बोललं जात आहे.
श्रीलंकेचा संघ दोन कसोटी सामने आणि तीन टी२० सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. सध्याच्या वेळापत्रकानुसार, यातील कसोटी मालिका २५ मार्चपासून बेंगळुरूमध्ये सुरू होणार आहे तर मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना मोहालीमध्ये खेळवला जाईल. दरम्यान, BCCI श्रीलंकेविरुद्ध भारताचा एक सामना हा दिवस-रात्र कसोटी सामना म्हणून आयोजित करण्याची योजना आखत आहे. भारताने आत्तापर्यंत मायदेशात बांगलादेश विरूद्ध कोलकातामध्ये आणि इंग्लंड विरूद्ध अहमदाबादमध्ये असे दोन दिवस रात्र पद्धतीचे गुलाबी चेंडू कसोटी सामने खेळले आहेत. त्यानंतर आता टीम इंडियाला आणखी एक डे नाईट टेस्ट खेळता यावी यासाठी BCCI चा सारा खटाटोप असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, श्रीलंकेने BCCI ला टी२० मालिकेच्या आयोजनाच्या ठिकाणाबाबत काही बदल करण्याची विनंती केली असून तसे बदल केले जाण्याची शक्यता आहे. मात्र टीओआयच्या वृत्तानुसार, मोहालीला दिवस रात्र पद्धतीचा कसोटी सामने खेळवला जाणं कठीण असून दव हा तेथे एक महत्त्वाचा घटक असण्याची शक्यता आहे. “तिसरी टी२० आणि पहिली कसोटी मोहालीला होणार आहे. त्याआधी पहिल्या दोन टी२० धरमशाला येथे खेळवल्या जाण्याची शक्यता आहे. लखनौला टी२० खेळवली जाण्याची शक्यता धूसर झाली आहे. तसेच मोहालीमध्ये गुलाबी चेंडूची कसोटी खेळवणं कठीण आहे. कारण दव ही मोठी भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. BCCI अजूनही देशातील कोविड परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याने वेळापत्रकातील बदल लवकरच जाहीर केले जातील", असं BCCIच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं आहे.