IND vs SA, Virat Kohli angry on Rishabh Pant: भारतीय संघाला आफ्रिकेविरूद्ध वन डे मालिकेत ३-० असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या दोन वन डे मध्ये सहज पराभूत झालेल्या टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात निकराची झुंज दिली, पण अखेर ती झुंज अपयशी ठरली. अनुभवी क्विंटन डी कॉकच्या शतकाच्या जोरावर आफ्रिकेने २८७ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन आणि विराट कोहली यांनी दमदार ९८ धावांची खेळी केली. पण ऋषभ पंतने मैदानावर येताच जे केलं, त्यामुळे विराट कोहली त्याच्यावर प्रचंड चिडला. विराटने काहीही बोलून दाखवलं नाही, पण त्याच्या एका नजरेतून त्याचा संताप दिसून आला.
२८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार केएल राहुल स्वस्तात बाद झाला. पण त्यानंतर अनुभवी शिखर धवन आणि विराट कोहली यांनी डाव सावरला. दोघांनी ९८ धावांची भागीदारी करत अर्धशतकेही झळकावली. धवन मोठा फटका मारायला गेला आणि झेलबाद झाला. पण भारतीय संघ सुस्थितीत होता. त्या वेळी ऋषभ पंत मैदानात उतरला. पंतने विराटसोबत संयमी खेळी करून चांगली भागीदारी करणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही. पहिल्याच चेंडूवर ऋषभ पंत पुढे येऊन फटका मारला. त्याच्या दुर्दैवाने चेंडू थेट फिल्डरच्या हातात जाऊन विसावला आणि पंत पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. पंतच्या या बेजबाबदार फटक्यामुळे विराटला राग अनावर झाला होता. पण तो शांत राहिला. विराटने रागाला आवर घातला असला तरी त्याच्या डोळ्यातूनच संताप दिसून आला. पाहा व्हिडीओ-
--
--
दरम्यान, ऋषभ पंत बाद झाल्यानंतर विराटने अर्धशतक झळकावलं. विराट बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव (३९) आणि श्रेयस अय्यर (२६) यांनी थोडी झुंज दिली. त्यानंतर दीपक चहरने मात्र तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन दमदार फलंदाजी केली. त्याने ५ चौकार आणि २ षटकार खेचत ५४ धावा कुटल्या. भारताला विजयासाठी अवघ्या १० धावा हव्या असताना चहर बाद झाला. पाठोपाठ जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहलही बाद झाला. त्यामुळे भारताने ४ धावांनी सामना गमावला.