आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियोजित वेळापत्रकानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे आयोजन पाकिस्तानात होणार आहे. पण, भारत या स्पर्धेसाठी आपला संघ पाकिस्तानात पाठवणार का याकडे क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आशिया चषकाची स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात बीसीसीआयला यश आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात आपला संघ पाठवण्यास बीसीसीआयने नेहमी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे टीम इंडियाचे सामने तटस्थ ठिकाणीच होतील असे बोलले जात आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी स्पर्धेसाठी जय्यत तयारी केल्याचे दिसते. शेजाऱ्यांनी स्टेडियमच्या बांधणीसाठी कोट्यवधी रूपये खर्च केले असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानातील जिओ न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने पाकिस्तानात होतील. तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा मुद्दाच उद्भवत नाही. आयसीसीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार सर्व सामने पाकिस्तानच्या धरतीवर होतील. पुन्हा एकदा १९ ते २२ जुलै या कालावधीत पीसीबीचे शिष्टमंडळ आयसीसीशी चर्चा करण्यासाठी कोलंबोला जाईल. कराची, रावळपिंडी आणि लाहोर येथे सामने खेळवण्याची योजना आहे.
तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तीन स्टेडियमच्या विकासासाठी १२.८० बिलियन रूपये खर्च केले आहेत. लाहोरचे गद्दाफी स्टेडियम, कराचीचे नॅशनल बँक क्रिकेट मैदान आणि रावळपिंडी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम या स्पर्धेच्या आधी नव्या सुविधांनी सजले आहे. भारतासह इतर सर्व आठ संघ पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येतील. आता भारताकडे कोणतेही कारण नसल्याने ते इथे येतीलच असा विश्वास आम्हाला आहे, असेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नमूद केले. १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे.