इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये युवा फलंदाज धुमाकूळ घातल आहेत... आयपीएल २०२३ नंतर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी लंडन ( WTC Final 2023) मध्ये जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध ( IND vs AFG) तीन सामन्यांची वन डे मालिका खेळेल. या स्पर्धेचे वेळापत्रक अन् संघ अद्याप BCCI कडून जाहीर केलेला नाही, परंतु ही मालिका आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी महत्त्वाची असणार आहे.
पण, या मालिकेत भारतीय संघ राखीव फळीतील खेळाडूंना संधी देण्याची संधी आहे आणि त्यात IPL 2023 मध्ये उल्लेखनीय खेळ करणाऱ्या खेळाडूंचाही समावेश असू शकतो. भारताचा कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांना अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या कर्णधारपद भूषवेल, तर उप कर्णधारपदासाठी रवींद्र जडेजा किंवा सूर्यकुमार यादव यांचा विचार केला जाऊ शकतो.
सलामीवीर शुबमन गिल याने वन डे संघात मिळालेल्या संधीचं सोनं करताना ९ सामन्यांत दोन शतकं व १ द्विशतक झळकावलं आहे. त्याच्यासोबत सलामीला यशस्वी जैस्वालला संधी दिली जाऊ शकते. २१ वर्षीय जैस्वालने आयपीएल २०२३ मध्ये १२ सामन्यांत ५७५ धावा केल्य आहेत. त्याला वन डे संघात संधी दिली जाऊ शकते आणि चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड याचाही विचार केला जाऊ शकतो. मधल्या फळीत विराट व श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. त्याच्यासह तिलक वर्मा व रिंकू सिगं यांनाही संधी मिळू शकते.
अष्टपैलू हार्दिक पांड्यासह रवींद्र जडेजा व अक्षर पटेल हे संघात असतील, तर CSKचा शिवम दुबे याचाही विचार केला जाऊ शकतो. इशान किशन हा रिषभ पंत व लोकेश राहुल यांच्या गैरहजेरीत संघात स्थान टिकवून आहेच... संजू सॅमसन व जितेश शर्मा यांना संधी मिळू शकते. युजवेंद्र चहल आयपीएल २०२३ गाजवतोय आणि त्याने १२ सामन्यांत २१ विकेट्स घेतल्या आहेत. वरुण चक्रवर्थी पुनरागमनासाठी सज्ज आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप यांच्यासह उम्रान मलिक किंवा दीपक चहर यांचा विचार होईल. पण, त्यांना समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही.