T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये सुपर-८ मध्ये प्रवेश करणारा भारत तिसरा संघ ठरला. या आधी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने ही फेरी गाठली. टीम इंडियाने यजमान अमेरिकेला पराभवाची धूळ चारली अन् सुपर-८ चे तिकीट मिळवले. आता सुपर-८ मध्ये २४ जून रोजी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होणार का अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. असे झाल्यास कांगारूंना पराभूत करून वन डे विश्वचषक २०२३ च्या फायनलमधील पराभवाचा वचपा काढण्याचे आव्हान रोहितसेनेसमोर असेल.
बुधवारी न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील यंदाच्या विश्वचषकातील अखेरचा सामना खेळवला गेला. माफक लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग करून भारताने विजय साकारला. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि शिवम दुबेची संयमी खेळी भारताला विजय देऊन गेली. भारतीय संघाने साखळी फेरीतील आपल्या तिसऱ्या सामन्यात अमेरिकेचा पराभव करून विजयाची हॅटट्रिक लगावली. टीम इंडियाने गोलंदाजीत कमाल करून अमेरिकेला ११० धावांत रोखले. यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर सूर्या आणि दुबेने मोर्चा सांभाळला.
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया थरार
दरम्यान, भारतीय संघाने सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. खरे तरे इथे ४-४ संघांचे २ गट असतील. यामध्ये टीम इंडिया अ गटात आहे. आता योगायोग असा की आतापर्यंत टीम इंडिया व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सुपर-८ मध्ये स्थान मिळवले आहे आणि दोघेही अ गटात आहेत. कारण स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आयसीसीने संघांच्या क्रमवारीनुसार टॉप-८ संघांचे गणित निश्चित केले होते. क्रमवारीतील वरच्या स्थानामुळे टीम इंडिया अ गटामध्ये पाकिस्तानपेक्षा वरचढ होती, त्यामुळे भारताला ए1 सीड देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ब गटात इंग्लंडला बी1 तर ऑस्ट्रेलियाला बी2 सीड मिळाले आहे.
सुपर-८ मध्ये अ गटात ए1, बी2, सी1 आणि डी2 आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया एकाच गटात आहे. या गटातील इतर दोन संघ कोणाविरूद्ध भिडणार हे अद्याप निश्चित नाही. पण, भारत आणि ऑस्ट्रेलिया अशी लढत होणार हे निश्चित मानले जात आहे. तसे झाल्यास सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सोमवारी २४ जून रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होईल.
Web Title: team india will face Australia on 24th June in the Super8 in St. Lucia. 🇮🇳 in t20 world cup 2024
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.