Join us  

टीम इंडिया विजयी ‘पंच’ मारणार! गत उपविजेत्या न्यूझीलंडचे आव्हान परतविण्यास सज्ज 

हार्दिकच्या जागेवर सूर्या खेळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 11:02 AM

Open in App

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर, धर्मशाला : वनडे विश्वचषकात चार सामन्यांत चार विजय मिळवून प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरविणारा भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्माच्या संघासमोर रविवारी हिमालयाच्या कुशीत वसलेल्या जगातील सर्वांत उंचीवरील धर्मशाला मैदानावर गत उपविजेत्या न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. सामन्यात रात्रीच्या वेळी पडणारे दवबिंदू निर्णायक भूमिका बजावतील.

न्यूझीलंडनेदेखील चार विजय नोंदविले आणि धावगतीत भारताच्या पुढे असल्याने गुणतालिकेत अव्वल स्थानावर हा संघ विराजमान झाला. किवी संघ टीम इंडियासाठी केवळ विश्वचषकच नव्हे, तर संपूर्ण आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वात मोठे आव्हान सिद्ध झाला आहे. न्यूझीलंडला २००३ च्या विश्वचषकापासून भारताने एकदाही हरवलेले नाही. येथे भारताने न्यूझीलंडला धूळ चारल्यास स्थिती बदलू शकते.

मग विजयासाठी भारताला काय करावे लागेल? सर्वप्रथम योग्य संयोजन करावेे लागेल. भारताने आतापर्यंत सर्वांत चांगली कामगिरी केली. खेळाडू फॉर्ममध्ये आहेत.  तीन वेगवान आणि तीन फिरकी असे टॅलेंटेड गोलंदाज आहेत, मागच्या सामन्यात हार्दिक जखमी झाल्याने भारताला धक्का बसला. तो एक आठवडा खेळणार नाही, असे दिसते. त्यामुळे बॅलेन्स बिघडले. तो लवकर परत येईल अशी आशा करूया...

या सामन्यात रणनीती कशी असेल? कुणाला स्थान मिळेल? अश्विन की शमी!  स्पिन ऑलराउंडर घ्यायचा झाल्यास अश्विनला झुकते माप मिळेल.  माझ्या मते, कोच आणि कर्णधार आठव्या स्थानापर्यंत फलंदाजीला पसंती देणार असतील  तर शार्दूलसह सूर्या किंवा ईशान यांच्यापैकी एकाला संधी दिली जाईल. गोलंदाजच खेळवायचा असेल तर, अश्विन आणि शमी यांच्यापैकी एकाचा विचार होऊ शकेल. न्यूझीलंडची फलंदाजी भक्कम आहे. 

केन विल्यमसन अंगठ्याच्या दुखापतीमुळे बाहेर असला तरी आघाडीच्या फळी धावा काढते आहे. बोल्ट, सॅंटनर, फर्ग्युसन, हेन्री  हे तगडे गोलंदाज असल्याने त्यांना सहज लेखण्याची चूक करू नये.

सूर्याच्या मनगटाला लागला चेंडू, ईशानच्या डोक्याला मधमाशीचा चावा!

धर्मशाला मैदानावर शनिवारी टीम इंडियाच्या सरावाच्यावेळी सूर्यकुमार यादवच्या मनगटाला चेंडू जोरात लागल्याने तो तळमळताना दिसला. दुसरीकडे फ्लड लाईटमध्ये नेटमध्ये फलंदाजीला आलेल्या ईशानच्या डोक्याला मधमाशीने चावा घेतला.

धर्मशालाचा रेकॉर्ड...

एकूण लढती : ०७, प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी : ०३ वेळा, पहिल्या डावात सरासरी धावा : २०३, सर्वोच्च धावसंख्या : इंग्लंड ३६४/९, वैयक्तिक सर्वाेच्च खेळी : डेव्हिड मलान १४० धावा, उत्कृष्ट गोलंदाजी : सुरंगा लकमल : १०-४-१३-४. भारत : सामने ०४, विजय ०२, पराभव ०२. न्यूझीलंड : सामना : ०१, विजय : ०१.

पिच रिपोर्ट...

उसळी असल्याने वेगवान गोलंदाजांना मदत करणारी. खेळ पुढे जाईल तेव्हा फिरकीपटू वर्चस्व गाजवतील. फलंदाजांना स्थिरावण्यास वेळ लागणार. नाणेफेक जिंकणारा संघ क्षेत्ररक्षण घेऊ शकतो.

वेदर रिपोर्ट...

रविवारी पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता. ४०  टक्के पावसाचा अंदाज.  टॉसलाही विलंब होऊ शकतो. दिवसभर ढगाळ वातावरण राहू शकते.

सामना : दुपारी २ वाजेपासून

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कप