एकदिवसीय क्रिटेक विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगल आहे. आता या पराभवाचे दु:ख बाजूला ठेवून भारतीय संघ गुरुवारपासून सुरू होण्याऱ्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. जून २०२४ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे आतापासून जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकापर्यंत भारतीय संघ केवळ ११ टी-२० सामने खेळणार आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय खेळाडूंसाठी आयपीएल महत्त्वाची ठरणार आहे.
पुढची टी-२० विश्वचषक स्पर्धा ही वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये संयुक्तरीत्या आयोजित होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ आणि अफगाणिस्तानविरुद्ध ३ टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ थेट विश्वचषक स्पर्धेत टी-२० सामने खेळण्यास उतरणार आहे. त्यातच गेल्या वर्षभरापासून भारतीय संघाचं नेतृत्व करत असलेला अष्टपैलू हार्दिक पांड्या हा विश्वचषक स्पर्धेदरम्यान, जखमी झाला होता. त्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आता आयपीएलपर्यंत तो तंदुरुस्त होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे पांड्याची तंदुरुस्ती ही भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. विश्वचषकापूर्वी सरावासाठी आयपीएलमध्ये उतरावे लागणार आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ज्येष्ठ खेळाडूंना संघातून विश्रांती देण्यात आली आहे. तर संघाचं नेतृत्व हे सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ईशान किशनसोबत ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पहिल्या सामन्यात कुणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वर्ल्डकपमध्ये इशान किशनला फारशी संधी मिळाली नव्हती. अशा परिस्थितीत त्याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. पहिल्या सामन्यात ईशान किशन आणि यशस्वी जयस्वाल हे सलामीला येऊ शकतात. तर सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर आणि तिलक वर्मा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येण्याची शक्यता आहे.
दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेला मुकलेला अष्टपैलू अक्षर पटेल या मालिकेमधून संघात पुनरागमन करणार आहे. तसे रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांच्यासाठीही ही मालिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारतीय संघाने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर भारताला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.