WTC Final Chances, IND vs BAN test: टीम इंडिया प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा मैदानात उतरणार आहे. १९ सप्टेंबरपासून घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध भारत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय संघाला याआधीच्या दोन्ही वेळा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यात यश आले असले तरी अंतिम फेरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी आयसीसीने टीम इंडियाला अंतिम फेरी गाठण्यासाठी किती संधी आहेत याचे अपडेट दिले आहे.
टीम इंडिया पुन्हा WTC फायनल खेळणार?
टीम इंडिया सध्या २०२३-२५ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये आघाडीवर आहे. भारताने ९ पैकी ६ सामने जिंकले आहेत आणि फक्त २ सामने गमावले आहेत. त्याचबरोबर एक सामना अनिर्णित राहिला आहे. या स्थितीत भारत ६८.५२ टक्के गुणांसह अव्वल आहे. आता टीम इंडियाचे १० कसोटी सामने बाकी आहेत. यातील ५ कसोटी भारतात आणि ५ सामने भारतात होतील. १० सामन्यांपैकी टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध २, न्यूझीलंडविरुद्ध ३ आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५ सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाने भारतात खेळले जाणारे पाचही कसोटी सामने जिंकले तर भारत ८० टक्के गुणांपर्यंत पोहोचेल. तेवढे गुणही अंतिम फेरीत गाठण्यासाठी पुरेसे ठरतील. अशा स्थितीत सध्या टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे.
इतर संघांची स्थिती कशी आहे?
गेल्या वेळी ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले होते. मात्र यावेळी त्यांना अंतिम फेरी गाठण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचे सध्या ७ सामने बाकी आहेत. यापैकी ते भारताविरुद्ध ५ कसोटी आणि श्रीलंकेत २ कसोटी सामने खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाने हे सर्व सामने जिंकले तर ते ७६ टक्के गुण गाठू शकतात. दुसरीकडे, न्यूझीलंडला सध्या ८ कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यांनी सर्वच्या सर्व सामने जिंकले तर ते ७८ टक्के गुण मिळवत ऑस्ट्रेलियाच्या पुढे जातील. आताच्या परिस्थितीत बांगलादेशचा संघ जास्तीत जास्त ७३ टक्के गुण गाठू शकतो. श्रीलंकेचा संघ ६९ टक्के, इंग्लंड ५८ टक्के, दक्षिण आफ्रिका ७० टक्के, पाकिस्तान ६० टक्के आणि वेस्ट इंडिज ४४ टक्के गुणांपर्यंत पोहोचू शकतात. अशा स्थितीत या संघांना अंतिम फेरी गाठणे कठीण दिसते.
Web Title: Team India will play the WTC final for the third time in a row Important update given by ICC
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.