Team India World Champions, PD Champions Trophy 2025 : बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची सुरुवात १९ फेब्रुवारीपासून होत आहे. यापूर्वी नुकतीच दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी श्रीलंकेत खेळली गेली. दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये रंगला. यात भारतीय संघाने सामना जिंकून दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी खूपच चांगली झाली. संपूर्ण स्पर्धेत भारताला केवळ एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत पोहोचलेला इंग्लंडचा संघ भारताला मात देऊ शकला नाही. त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
दिव्यांग भारतीय संघ ठरला चॅम्पियन!
दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाकडून दमदार कामगिरी पाहायला मिळाली. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकात ४ गडी गमावून १९७ धावा केल्या. या काळात योगेंद्र सिंह भदौरियाने सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने ४० चेंडूत ७३ धावा केल्या. तर माजिद मगरेनेही १९ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. दुसरीकडे १९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ११८ धावा करू शकला. त्यामुळे त्यांना ७९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण ४ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत भारत आणि इंग्लंडशिवाय पाकिस्तान आणि श्रीलंकेचे संघही खेळण्यासाठी आले होते. भारतीय संघ साखळी फेरीत सर्वाधिक यशस्वी ठरला. त्यांना ६ पैकी ५ सामन्यात विजय मिळाले आणि फक्त १ सामना गमवावा लागला. या स्पर्धेत भारतीय संघाची कमान विक्रांत रवींद्र केणी याच्याकडे होती. या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला हरवून आपल्या मोहिमेला सुरुवात केली. साखळी टप्प्यातील चौथ्या सामन्यातही भारताने पाकिस्तानचा पराभव केला. इंग्लंडने ग्रुप स्टेजमध्ये भारताला पराभूत केले होते. भारतीय संघाने फायनल जिंकून त्या पराभवाचा बदला घेतला.