Team India Won T20 World Cup 2024 : तब्बल १३ वर्षांनंतर भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकल्याचा आनंद सर्वत्र साजरा केला जात आहे. २००७ नंतर प्रथमच टीम इंडियाने ट्वेंटी-२० विश्वचषकाचा किताब उंचावला. भारताच्या क्रिकेट संघाने १३ वर्षांच्या ट्रॉफीचा दुष्काळ संपवत शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने १३ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली, तर २००७ नंतर भारताने प्रथमच ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटला अर्थात ट्वेंटी-२० क्रिकेटला रामराम केले. दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास पळवून रोहितसेनेने विजय साकारला. जेतेपद पटकावल्यानंतर सर्वच भारतीय खेळाडू भावूक झाल्याचे दिसले. चाहत्यांसह भारताच्या महिला क्रिकेट संघाने देखील आनंद साजरा केला. सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध एकमेव कसोटी सामना खेळत असलेल्या भारताच्या महिला शिलेदारांनी विश्वविजेत्या संघाचे अभिनंदन केले.
बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारताचा महिला क्रिकेट संघ पुरूष संघाला शुभेच्छा देत असून, त्यांचे अभिनंदन करत आहे. खरे तर आगामी काळात बांगलादेशच्या धरतीवर महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.
२०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला. २०११ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न मिळालेल्या संधीचं दुःख अखेर त्याच्या मनातून दूर झाले असावे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला संघाने जेतेपदाच्या ट्रॉफीसह निरोप दिला. हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराह यांनी आफ्रिकेच्या हातातून सामना खेचून आणला. सूर्यकुमार यादने २०व्या षटकात घेतलेला कॅच आफ्रिकेच्या पराभवासाठी पुरेसा ठरला. भारताच्या ७ बाद १७६ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला ८ बाद १६९ धावाच करता आल्या आणि भारताने ७ धावांनी सामना जिंकला. ६ चेंडूंत १६ धावा आफ्रिकेला करायच्या होत्या. हार्दिकने टाकलेला पहिलाच चेंडू डेव्हिड मिलरने सीमापार पाठवला होता, परंतु सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला. मिलर ( २१) रडत रडत मैदानाबाहेर गेला. हार्दिकने २०व्या षटकात आणखी एक विकेट घेऊन भारताचा विजय पक्का केला.