भारतीय संघ सिडनीच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या २०२३-२४ च्या हंगामातील आपला शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. याआधी बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पराभवामुळे क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात WTC फायनल खेळण्याचा टीम इंडियाचा मार्ग खडतर झाला आहे. पण अजूनही टीम इंडियाची आस कायम आहे. ११ ते १५ जून, २०२५ या कालावधीत लॉर्ड्सच्या मैदानात फायनल खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याची अजूनही संधी
सध्याच्या घडीला भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत टिकणं मुश्किल वाटत असले तरी दोन विजयानं अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होऊ शकते. दोन विजयाच्या जोरावर टीम इंडियासाठी लॉर्ड्सच्या मैदानात फायनल खेळण्याचे दरवाजे उघडले जाऊ सकतात. आता तुम्ही म्हणाल, यंदाच्या हंगामात टीम इंडिया शेवटचा सामना खेळणार मग दोन विजयासह टीम इंडिया फायनल कशी गाठणार? इथं आपण हे कोडं अन् टीम इंडियाच्या बाजूनं कसं झुकू शकतं पारडं ते समजून घेऊयात.
कुणाच्याही जमेत नसणाऱ्या संघानं दाबात मारली फायनलमध्ये एन्ट्री
आयससी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीत सुरुवातीपासून टीम इंडिया आघाडीवर होती. पण घरच्या मैदानावर किवींनी टीम इंडियाला ३-० असा शह दिला अन् इथूनंच संघाची WTC फायनल खेळण्याचं गणित बिघडलं. ज्या संघाला कुणीच जमेत धरलं नव्हतं तो दक्षिण आफ्रिकेचा संघ फायनलसाठी पहिल्यांदा पात्र ठरला. आता एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा उरली आहे.
दोघांत तिसरा सीन; टीम इंडियाच्या समोरील पहिलं टार्गेट काय?
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं फायनल गाठल्यावर एका जागेसाठी भारत-ऑस्ट्रेलिया हे दोन संघ शर्यतीत असतील, असा अनेक क्रिकेट चाहत्यांचा समज होतो. पण या दोन्ही संघांशिवाय श्रीलेकाचा संघही या शर्यतीत आहे. आता या परिस्थितीत लॉर्ड्सच्या मैदानात खेळण्याच्या आशा पल्लवित ठेवण्यासाटी टीम इंडियाला आधी सिडनीचं मैदान मारावे लागेल. ज्या दोन विजयावर टीम इंडियाची आशा पल्लवित आहे त्यातील हा एक महत्त्वाचा विजय असेल. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघ १-२ अशा पिछाडीवर आहे. एवढेच नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारीही ऑस्ट्रेलियापेक्षा कमी आहे. मेलबर्नच मैदान मारल्यावर ऑस्ट्रेलियासाठी नवे आव्हान निर्माण होईल. दुसरीकडे भारतीय संघ 'वेट अँण्ड वॉच' भूमिकेत जाईल.
दुसरा विजय कोणता? ज्यावर टीम इंडियाच्या खिळलेल्या असतील नजरा
सिडनीच्या कसोटीनंतर भारतीय संघाचे यंदाच्या हंगामातील सर्व कसोटी सामने पूर्ण होतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या यंदाच्या हंगामातील शेवटची मालिका ही श्रीलंकेत खेळणार आहे. त्यामुळे कांगारुंसाठी ही लढाई सोपी नसेल. जर श्रीलंकेच्या संघान या मालिकेत एक विजय मिळवला आणि मालिका १-० अशी जिंकली तर टीम इंडियासाठी फायनलचा मार्ग मोकळा होईल.
श्रीलंका जिंकावी, पण...
श्रीलंकेचा घरच्या मैदानातील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील एक विजय टीम इंडियाला फायद्याचा आहे. पण चुकूनही त्यांनी दुसरी कसोटी जिंकून इतिहास रचू नये, याची प्रार्थनाही टीम इंडिया आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांना करावी लागेल. कारण जर श्रीलंकेच्या संघाने या मालिकेत २-० असा विजय मिळवला तर हा संघ फायनलसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ठरेल. ऑस्ट्रेलियाला एक विजय फायनलच तिकीट मिळवून देईल.