icc hall of fame 2024 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मिस्टर ३६० एबी डिव्हिलियर्ससहॲलिस्टर कुक आणि नीतू डेव्हिड यांचा हॉल ऑफ फेमसाठी समावेश केला. बुधवारी आयसीसीने ही मोठी घोषणा करताना इंग्लंडचा माजी खेळाडू कुक, दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डिव्हिलियर्स आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी खेळाडू डेव्हिड यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. आपला जवळचा सहकारी या मोठ्या सन्मानास पात्र ठरताच भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीनेएबी डिव्हिलियर्सचे पत्राद्वारे अभिनंदन केले. किंग कोहलीने लांबलचक पत्र लिहिताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच डिव्हिलियर्सच्या खेळीला दाद देत कोहलीने त्याचे 'विराट' अभिनंदन केले. विराट आणि एबी मोठ्या कालावधीपर्यंत आयपीएलमध्ये एका संघाकडून खेळले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना या जोडीने भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडला.
मिस्टर ३६० चे अभिनंदन करताना विराटने म्हटले की, एबी, तुझी आयसीसी हॉल ऑफ फेमसाठी निवड झाली याचा अभिमान वाटतो. म्हणूनच तुझ्यासाठी हे लिहित आहे. तू यासाठी पात्र आहेसच... तू ज्या पद्धतीने क्रिकेट या खेळावर प्रभाव टाकलास ते खूपच दुर्मिळ आहे. लोक नेहमीच तुझ्या क्षमतेबद्दल भाष्य करत असतात. मी आतापर्यंत ज्यांसोबत खेळलो त्यापैकी तू सर्वात प्रतिभावान खेळाडू आहेस. क्रिकेटच्या विश्वात तुला जे हवे असते ते करण्यात तू यशस्वी ठरला. हे माझ्यासह सर्वांसाठीच खूप खास आहे. २०१६ मध्ये आरसीबीकडून खेळत असताना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना आजही मला आठवतो. तुला मांडत असताना यापेक्षा मोठे उदाहरण असू शकत नाही.
"आपण १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होतो. समोर आंद्रे रसेल, सुनील नरेन, मॉर्नी मॉर्केल आणि शाकिब अल हसन यांचा घातक मारा होता. संघाची धावसंख्या ७० अशी असताना तू फलंदाजीला आला तेव्हा नरेन षटक टाकत होता. सुरुवातीचे काही चेंडू निर्धाव गेले असता तू मला टाइमआउटमध्ये मी त्याला नीट खेळू शकत नाही असे सांगितलेस. मग मी तुला मला स्ट्राईक देण्यास सांगितले आणि मी चौकार मारण्याचा प्रयत्न केला. सुनील नरेनच्या पुढच्या षटकात मी दुसऱ्या टोकाला असताना तू स्ट्राईक देशील या आशेवर बसलो होतो. पण, अचानक तू मला सरप्राईज दिले आणि मैदानाच्या डाव्या बाजूला ९४ मीटर लांब षटकार मारला. मधल्या ब्रेकमध्ये काय झाले याची मला कल्पना नाही. म्हणूनच मी तेव्हा तुला सांगितले की, तू खूप वेगळा आहेस... तुझ्यासोबत फलंदाजी करत असताना अशा कित्येक आठवणी आहेत. हे हास्यास्पद क्षण तुझ्यामुळे अनुभवायला मिळाले", असे विराटने अधिक म्हटले.