भारताने सिडनी मैदानावर रविवारी आॅस्ट्रेलियाला तिसऱ्या सामन्यात धूळ चारून टी२० मालिका बरोबरीत सोडवली. त्याआधी पावसाने व्यत्यय आणला नसता तर मेलबोर्न मैदानावर बाजी मारून द्विपक्षीय मालिकेत विजयी घोडदौड भारताने कायम राखली असती, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
भारतीय संघाच्या या विजयात खेळाडूंनी दाखविलेला झुंजारपणा आणि सांघिक वृत्ती यामुळे मी प्रभावित झालो. गोलंदाजीत कृणाल पांड्याने नेतृत्व करीत भेदकता सिद्ध केली. याआधीही तो विंडीजविरुद्धच्या मालिकेत आणि सध्याच्या मालिकेतील ब्रिस्बेन सामन्यात प्रभावी ठरला होताच. पण रविवारी त्याने मारलेली मुसंडी स्मरणात राहण्यासारखी आहे. कृणाल कुठलीही गोष्ट लवकर शिकतो. खेळपट्टीचा वेध घेत हवेत चेंडू फिरविण्याची कला त्याने आत्मसात केली. त्याने बाद केलेले चार फलंदाज हे गोलंदाजीतील क्षमता आणि त्याच्यातील हुशारीचे फलित आहेत, असे म्हणण्यास हरकत नाही.
खलील अहमद हा देखील भविष्यातील गोलंदाज असेल. या युवा खेळाडूमध्ये चेंडू स्विंग करण्याची कमालीची क्षमता असल्याने फलंदाजांना खिळवून ठेवण्याचे शस्त्र आहे. त्याला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्यास खलील हा जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वरच्या सोबतीला वेगवान गोलंदाजांच्या कोअर ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकेल.
शिखर धवनच्या फटकेबाजीने देखील मला फार प्रभावित केले. तो भरात असेल तर फटके मारताना खूपच धोकादायक होतो. वायुवेगाने मारत असलेले त्याचे फटके पाहण्यासारखे असतात. जानेवारीत होणाºया एकदिवसीय मालिकेत शिखर उपयुक्त असू शकतो. त्याचे ४० ते ६० धावांचे योगदान संघाच्या वाटचालीत मोलाचे ठरेल. याशिवाय विराट कोहली स्वत: तिसºया स्थानावर येऊन सामन्याचे चित्र पालटण्यास सक्षम आहे. शैलीदार फटकेबाजी, आक्रमकता, पॉवर आणि अचूक वेळ या बळावर विराट ‘गेम चेंजर’ ठरतो. काल त्याने हेच दाखवून दिले. विराट मधल्या फळीत आला तरी धावांचा पाठलाग करीत सामना संपविताना आपण त्याला अनेकदा पाहिलेच आहे. दिनेश कार्तिक देखील मधल्या फळीत खेळून सामना फिरवू शकतो. कर्णधाराच्या सोबतीने विजयावर शिक्कामोर्तब करताना कार्तिकला पाहणे सुखावह असते.
आॅस्ट्रेलियाबाबत बोलायचे झाल्यास आगामी कसोटी सामन्यात भारताकडून मिळणाºया आव्हानांसाठी यजमानांना सज्ज रहावे लागेल. अॅरोन फिंच आणि मिशेल स्टार्क यांचा अपवाद वगळता यजमान संघातील अन्य कुणी खेळाडू झकास सुरुवात करून देण्यास सक्षम असेल याबद्दल मी तरी साश्ांक आहे.