आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये सुरू असलेल्या लढतीत भारतीय गोलंदांजांनी विध्वंसक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये लढत सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानचा डाव अवघ्या १९१ धावांत गुंडाळला. आता पाकिस्तानवर मात करण्यासाठी भारतीय संघासमोर १९२ धावांचं माफक आव्हान आहे. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा या सर्वांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.
भारताने प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यानंतर अब्दुल्ला शफिक आणि इमाम उल हक यांनी जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज यांचा वेगवान मारा आरामात खेळून काढला. दरम्यान, इमाम उल हकने सिराजच्या एका षटकात तीन चौकार ठोकत १२ धावा वसूल केल्या. एकीकडे जसप्रीत बुमराहचा मारा अचूक होत असताना पाकिस्तानी सलामीवीर मोहम्मद सिराजला लक्ष्य करत होते. ७.५ षटकांमध्ये पाकिस्तानने बिनबाद ४१ अशी आगेकूच केली होती. मात्र याच षटकातील शेवटच्या चेंडूवर मोहम्मद सिराजने अब्दुल्ला शफिकला पायचित केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. अब्दुल्ला शफिकने २० धावा काढल्या.
त्यानंतर बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी मोर्चा सांभाळला. इमामने काही चांगले फटकेही खेळले. मात्र १३ व्या षटकात हार्दिक पांड्याने इमामचं काम तमाम करताना त्याला यष्टीमागे लोकेश राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले. इमाम उल हकने ३८ चेंडूत ३६ धावांची आक्रमक खेळी केली. याचदरम्यान, १४ व्या षटकात रवींद्र जडेजाने मोहम्मद रिझवानला पायचित केले. पण रिझवानने घेतलेल्या डीआरएसमध्ये चेंडून यष्ट्यांना लागत नसल्याचे दिसल्याने रिझवान बचावला. मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत रिझवाने खेळपट्टीवर पाय रोवले. तसेच बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत पाकिस्तानला शंभरीपार नेले. २५ षटकांअखेर पाकिस्तानच्या २ बाद १२५ धावा झाल्या होत्या.
मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या डावाला गळती लागली. मोहम्मज सिराजने बाबर आझमचा (५०) त्रिफळा उडवत पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. तर ३३ व्या षटकामध्ये कुलदीप यादवने सौद शकील (६) आणि इफ्तिकार अहमद (४) यांना माघारी धाडले. तर एक बाजू लावून धरणाऱ्या मोहम्मद रिझवानचा जसप्रीत बुमहारने ३४ व्या षटकात त्रिफळा उडवला. या धक्क्यांमधून पाकिस्तानचा संघ सावरण्यापूर्वीच बुमराहने ३६ व्या षटकात शादाब खानची दांडी गुल केली. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था ७ बाद १७१ अशी झाली होती.
आघाडीची आणि मधली फळी कोलमडल्यावर पाकिस्तानच्या शेपटाने थोडीफार वळवळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र हार्दिक पांड्याने मोहम्मद नवाजची शिकार करत पाकिस्तानला आठवा धक्का दिला. तर रवींद्र जडेजाने हसन अली आणि हॅरिस रौफ यांचे पार्सल बांधत पाकिस्तानचा डाव अवघ्या १९१ धावांवर गुंडाळला.