mohammed shami : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं यंदाचा वन डे विश्वचषक गाजवला. सर्वाधिक बळी घेऊन शमीनं मिळालेल्या संधीचं सोनं केलं. आता तो दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार आहे. अशातच शमीनं एक विधान करून टीकाकारांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. शमीने 'सजदा' वादावर भाष्य करत याप्रकरणी अखेर मौन सोडलं. त्यानं सांगितलं की, ज्या दिवशी मला 'सजदा' करायचा असेल, तेव्हा मी अभिमानानं ते करेल. मला यापासून कोणी रोखू शकत नाही.
भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकात शमीनं अप्रतिम कामगिरी केली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्यानं पाच बळी घेतल्यानंतर तो गुडघ्यावर खाली बसला होता. यानंतर पाकिस्तानी ट्रोलर्संनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. शमीला 'सजदा' करायचा होता पण भीतीमुळे तो करू शकला नाही, असं पाकिस्तानातील काही ट्रोलर्संनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटलं. यावर बोलताना शमीनं टीकाकारांची बोलती बंद केली. शमी विश्वचषकातील पहिल्या चार सामन्यात खेळू शकला नव्हता. मात्र संधी मिळतात त्यानं पंजा मारला आणि सात सामन्यांमध्ये सर्वाधिक २४ बळी घेण्याची किमया साधली.
शमीचं टीकाकारानं प्रत्युत्तर "मला 'सजदा' करायचा असेल तर मला असं करण्यापासून कोण रोखणार? मला ते करायचं असेल तेव्हा मी नक्की करेन. मी अभिमानानं सांगेन की मी मुस्लिम आहे. मी अभिमानानं सांगेन की मी भारतीय आहे. यात काय अडचण आहे? 'सजदा' करण्यासाठी मला कोणाची परवानगी मागावी लागली तर मी या देशात का राहावे? पाच बळी घेतल्यानंतर मी यापूर्वी असे केले आहे का? मी अनेकदा पाच बळी घेतले आहेत. त्यामुळे तुम्ही मला सांगाल तिथे जाऊन सजदा करेन", असे शमीनं सांगितलं. तो एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
... म्हणून खाली बसलो होतोदरम्यान, श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात पाच बळी घेतल्यानंतर शमी खाली बसला होता. याचाच दाखला देत काहींनी त्याला 'सजदा' करण्यापासून रोखले असल्याचा तर्क लावला. मात्र, यावर बोलताना शमीनं थकल्यामुळं खाली बसलो होतो असं सांगितलं. शमीनं म्हटलं, "टीका करणारी मंडळी कोणाचीच नसते. त्यांना फक्त गोंधळ घालायचा असतो. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मी २०० टक्के मेहनत घेऊन गोलंदाजी केली. विकेट झपाट्याने पडत होत्या आणि तीन बळी घेतल्यानंतर मला वाटलं की आज आणखी पाच बळी मिळतील. मी तेव्हा खूपच थकलो होतो. मी माझी संपूर्ण ताकद गोलंदाजीमध्ये लावली होता. त्यामुळं मी पाचवा बळी घेतल्यानंतर मैदानावर गुडघे टेकले. लोक याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागले. माझ्या मते अशा गोष्टी बनवणार्यांना दुसरे काम नसते. मी थकलो होतो त्यामुळे खाली बसलो."