भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने, 2007 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघाला येत असलेल्या अपयशामुळे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर, महान फलंदाज सचिन तेंदुलकरला भारतीय संघाचा कर्णधार बनविण्याची शरद पवार यांची इच्छा होती. मात्र, तसे होऊ शकले नाही. तेव्हा पवार हे BCCI चे अध्यक्ष होते. सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा टीम इंडियाचा कर्णधार बनवण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, मास्टर ब्लास्टरने यासाठी नकार दिला होता.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस. ते 2005 ते 2008 पर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष होते. एकदा स्वतः शरद पवार एक मोठा खुलासा करताना म्हणाले होते की, "2007 मध्ये जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता, तेव्हा कर्णधार राहुल द्रविड त्यांच्याकडे गेला आणि त्याने कर्णधारपद सोडण्याचा त्याचा निर्णय सांगितला. कर्णधारपदामुळे त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत असल्याचे त्याने सांगितले होते. द्रविडने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, सचिन तेंडुलकरने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळावी, अशी माझी इच्छा होती. पण, यासाठी त्याने नकार दिला होता."
तेंडुलकरने दिला होता नकार - सचिन तेंडुलकरने 1996 ते 2000 पर्यंत टीम इंडियाचे नेतृत्व केले. मात्र, त्याने याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर होत असल्याचे पाहून कर्णधारपद सोडले होते. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला 73 एकदिवसीय सामन्यांपैकी केवळ 23 सामने आणि 25 पैकी केवळ 4 कसोटी सामनेच जिंकता आले आहेत. यानंतर, शरद पवार यांनी 2007 मध्ये सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा टीम इंडियाचे कर्णधार पद स्वीकारण्यास सांगितले होते, तेव्हा त्याने याच कारणामुळे हे पद स्वीकाण्यास नकार दिला होता.
मग धोनीची अशी लागली लॉटरी - शरद पवार यांनी खुलासा केला की, सचिन तेंदुलकरने स्वतः कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिला होता. पण याच वेळी त्याने महेंद्र सिंह धोनीचे नाव सुचवले होते. यानंतर, महेंद्र सिंह धोनीला भारतीय संघाचा कर्णधार बनविण्यात निर्णय घेण्यात आला होता.'