IPL 2025 Rajasthan Royals Head Coach Rahul Dravid : कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. या विश्वचषकासह राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. त्यांच्यानंतर ही जबाबदारी गौतम गंभीर सांभाळत आहे. बीसीसीआयसोबतचा करार संपल्यानंतर द्रविड आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे. खरे तर द्रविड कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा प्रशिक्षक होईल अशी चर्चा आहे. कारण केकेआरचा मार्गदर्शक गंभीर आता टीम इंडियासोबत जोडला आहे. पण, आता द्रविड त्याची जुनी फ्रँचायझी राजस्थान रॉयल्ससोबत काम करणार असल्याचे कळते.
राजस्थान रॉयल्स आणि राहुल द्रविड यांच्यात चर्चा सुरू आहे. याबद्दल लवकरच घोषणा केली जाईल, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले. भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून, तिथे ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळवली जात आहे. गौतम गंभीरची प्रशिक्षक म्हणून ही पहिलीच परीक्षा असेल. टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळेल, तर तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करेल. दरम्यान, राजस्थानच्या संघाने आयपीएलच्या पदार्पणाच्या हंगामाचा किताब जिंकला आहे.
राहुल द्रविड मोठ्या कालावधीपर्यंत राजस्थानच्या संघाचा भाग राहिले आहेत. २०१३ मध्ये ते राजस्थानच्या संघाचे कर्णधार बनले. त्यांनी चॅम्पियन्स लीग टी-२० फायनल आणि आयपीएलच्या प्लेऑफपर्यंत संघाला नेले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१५ मध्ये त्यांनी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली. तेव्हा राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला होता. आताच्या घडीला राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कुमार संगकारा कार्यरत आहे. २०१५ पासून राहुल द्रविड बीसीसीआयशी जोडले आहेत, त्यांनी भारताच्या अंडर-१९ आणि भारत अ संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. मग एनसीएमध्ये अध्यक्षपदाचा कारभार सांभाळला. अखेर ऑक्टोबर २०२१ पासून त्यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली.