चेन्नई : अष्टपैलू हार्दिक पांड्या (८३) व अनुभवी महेंद्रसिंह धोनी (७९) यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या ११८ धावांच्या निर्णायक भागीदारीनंतर गोलंदाजांच्या अचूक मा-याच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात डकवर्थ लुईस नियमाद्वारे आॅस्ट्रेलियाचा २६ धावांनी पराभव केला. यासह भारताने ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ७ बाद २८१ धावा उभारल्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे आॅस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार २१ षटकांत १६४ धावांचे आव्हान मिळाले. भारताने आॅसीला ९ बाद १३७ असे रोखत बाजी मारली. अर्धशतक झळकावल्यानंतर २ महत्त्वपूर्ण बळी घेणा-या हार्दिकला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.धावांचा पाठलाग करताना पाहुण्यांचा डावही अडखळला. हिल्टन कार्टराइट (१), कर्णधार स्टीव्ह स्मिथ (१), ट्रॅव्हिस हेड (५) हे झटपट परतल्याने त्यांचा डाव ७ व्या षटकात ३ बाद २९ असा घसरला. यानंतर स्थिरावलेला डेव्हिड वॉर्नर २८ चेंडूंत २५ धावा करून परतला. मात्र, मॅक्सवेलने तुफानी हल्ला करीत आॅसीच्या आशा कायम राखल्या. त्याने कुलदीप यादववर जबरदस्त हल्ला करताना त्याच्या एका षटकात एका चौकारासह ३ षटकार ठोकले. यजुवेंद्र चहलने त्याचा बहुमूल्य बळी मिळवत भारताच्या विजयातील अडथळा दूर केला. मॅक्सवेलने १८ चेंडंूत ३ चौकार व ४ षटकारांसह ३९ धावांचा तडाखा दिला. यानंतर ठराविक अंतराने भारताने कांगारुंना बाद केले. जेम्स फॉल्कनरने अखेरपर्यंत टिकून राहत २५ चेंडूंत नाबाद ३२ धावांची अपयशी झुंज दिली. चहलने ३० धावांत ३, तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यांनी प्रत्येकी २ बळी घेत आॅसीला अडचणीत आणले.तत्पूर्वी, अजिंक्य रहाणे (५), विराट कोहली (०), मनीष पांड्ये स्वस्तात बाद झाल्याने अडचणीत आलेल्या भारताला रोहित शर्मा (२८) आणि केदार जाधाव (४०) यांनी चौथ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी करून सावरले. पण लगेचच रोहित झेलबाद झाला. त्याने ४४ चेंडूंत ३ चौकारांसह २८ धावा केल्या.केदार ५४ चेंडूंत ५ चौकारांसह ४० धावा करून बाद झाला. या वेळी भारताचा अर्धा संघ ८७ धावांत बाद झाला होता. नंतर आलेल्या हार्दिकने सामन्याचे चित्रच पालटले. त्याने आॅसी गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. ६६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी करताना हार्दिकने ८३ धावांची तडाखेबंद खेळी केली. हार्दिक बाद झाल्यानंतर धोनीने ८८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ७९ धावा फटकावल्या. भुवीने ३० चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ३२ धावांचा तडाखा दिला. >धोनीने ७९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शंभरावे अर्धशतक झळकावले. अशी कामगिरी करणारा तो विश्वातील १३ वा, तर चौथा भारतीय फलंदाज ठरला. भारतीयांमध्ये याआधी अशी कामगिरी सचिन तेंडुलकर (१६४), राहुल द्रविड (१४६) आणि सौरभ गांगुली (१०७) यांनी केली आहे.धोनीने ३०२ एकदिवसीय सामन्यांत ६६, ९० कसोटी सामन्यांत ३३, तर ७८ टी-२० सामन्यांत एक अर्धशतक झळकावले आहे. शिवाय, एकदिवसीय सामन्यात १० हजार धावांचा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर धोनी असून यासाठी त्याला केवळ २६३ धावांची आवश्यकता आहे.
धावफलक :भारत : अजिंक्य रहाणे झे. वेड गो. कुल्टर नाइल ५, रोहित शर्मा झे. कुल्टर नाइल गो. स्टोइनिस २८, विराट कोहली झे. ग्लेन मॅक्सवेल गो. कुल्टर नाइल ०, मनीष पांड्ये झे. वेड गो. कुल्टर नाइल ०, केदार जाधव झे. कार्टराइट गो. स्टोइनिस ४०, महेंद्रसिंह धोनी झे. वॉर्नर गो. फॉल्कनर ७९, हार्दिक पांड्या झे. फॉल्कनर गो. झम्पा ८३, भुवनेश्वर कुमार नाबाद ३२, कुलदीप यादव नाबाद ०. अवांतर - १४. एकूण : ५० षटकांत ७ बाद २८१ धावा. गोलंदाजी : पॅट कमिन्स १०-१-४४-०; नॅथन कुल्टर नाइल १०-०-४४-३; जेम्स फॉल्कनर १०-१-६७-१; मार्कस स्टोइनिस १०-०-५४-२; अॅडम झम्पा १०-०-६६-१.आॅस्टेÑलिया : डेव्हिड वॉर्नर झे. धोनी गो. कुलदीप २५, हिल्टन कार्टराइट त्रि. गो. बुमराह १, स्टीव्ह स्मिथ झे. बुमराह गो. पांड्या १, ट्रॅव्हिस हेड झे. धोनी गो. पांड्या ५, ग्लेन मॅक्सवेल झे. पांड्ये गो. चहल ३९, मार्कस स्टोइनिस झे. जडेजा गो. कुलदीप ३, मॅथ्यू वेड यष्टिचित धोनी गो. चहल ९, जेम्स फॉल्कनर नाबाद ३२, पॅट कमिन्स झे. बुमराह गो. चहल ९, नॅथन कुल्टर नाइल झे. केदार गो. भुवनेश्वर २. अॅडम झम्पा नाबाद ५. अवांतर - ६. एकूण : २१ षटकांत ९ बाद १३७ धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ४-०-२५-१; जसप्रीत बुमराह ४-०-२०-१; हार्दिक पांड्या ४-०-२८-२; कुलदीप यादव ४-०-३३-२; यजुवेंद्र चहल ५-०-३०-३.