(होळीनिमित्त बोंब मारण्याची पद्धत तशी जुनीच, पण हीच गोष्ट टीम इंडियामध्ये घडली तर काय गंमत घडू शकते, त्याचा हा कल्पनाविलास. सत्य आणि वास्तावाशी याचा संबंध नाही.)रवी शास्त्री यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने होळी सजवली. बी अरुण आणि संजय बांगर होळीवर बत्तांशांची माळ चढवत होते. तयारी तशी झाली होतीच. पण सारेच वाट पाहत होते ते कप्तान विराट कोहलीची. कारण विराट आणि अनुष्का हे नवदांपत्य पूजेला बसणार होतं. सारे खेळाडू हातात गुलाल घेऊन उभेच होते. तेवढ्यात विरुष्का बाहेर आले. सारेच त्यांच्याकडे धावले पण कोहलीने आधीच सांगितले, 'पूजेनंतरच रंग लावायचा आणि वहिनीला रंग लावाल तर याद राखा'. सारे आपसूकच दूर झाले. शास्त्री गुरुजी पूजा सांगायला बसलेच होते. अरुण यांनी त्यांची सगळी 'व्यवस्था' करूनच ठेवली होती. नवदाम्पत्य पूजेला बसणार इतक्यात सचिन, हरभजन, वीरु, गंभीर, गांगुली, लक्ष्मण... हेही आले. कोहली थोडा थांबला, सचिनला भेटला, बाकीच्यांना फक्त नजरच दिली. गंभीर, युवी, भज्जी त्याच्यावर थोडे वैतागले होतेच. पूजा झाल्यावर त्यांनी बोंब मारायला सुरुवात केली.सुरुवात सलामीवीर गौतम गंभीरने केली...सध्याच्या संघात माझा काहीच नाही थांग, कधी मला संधी मिळेल हे दिल्लीकरा कोहली तू तरी सांग. आधी धोनीने केला गेम, तू तसंच करतोयस सेम, काही तरी करून संघात दे स्थान, त्यासाठी काय करू ते तरी सांग
हरभजन तर यासाठी आतुरलेलाच होता. गंभीरनंतर तो सरसावला. विश्वचषकानंतर अश्विनने घेतली माझी जागा. त्याचेच स्थान आता झाले खालसा. कुलदीप-चहल हे आहेत छोटे, कधीही पडेल त्यांचे पितळ खोटे. आता मला तरी संधी द्या, शास्त्री सर, विश्वचषकाचा चढेल काही महिन्यांतच ज्वर, हरभजन पुढे अजून बोलणारच होता, पण सचिनने नजरेनेच त्याला थांबवले...
भज्जीनंतर आला युवी. त्यांच्याकडे बरंच काही होतं, सांगण्यासारखं. पण मनात साठलेलं त्याला मांडता नाही आलं सगळं. जुना मित्र माझा माही, पण त्याचाच माझ्यावर भरवसा नाही,दोस्तीचे तू चांगले फेडले पांग, तू तरी संघात कसा राहशील, ते तरी सांग. विश्वचषक तर खेळायचाय मला, तुझा आता पाठिंबा घेऊ तरी कशाला?
युवीनंतर अश्विन आला. माझा कॅरम बॅाल करी साऱ्यांचे हाल. भज्जीची काढली होती मीच विकेट, पण आता माझंच करीअर नाही सेट. वनडे आणि ट्वेन्टी-20 मधलं स्थान हाऊ कॅन आय गेट.
अश्विननंतर आला जडेजा. धोनी होता माझा ताता, आता कुणीच नाही माझा दाता. चवन्नीवर टाकण्याचं माझं आहे कसब, पण कोहली धोनीचा राग माझ्यावर का काढतो, हे नाही समजतं.
यांच्या बोंबा टाकून होताच नव्या दमाचे शिलेदार आले आणि त्यांनी वेगळाच सूर लावला.कोहली भारी, शास्त्री सर पण भारी आणि आम्ही काहीही केलं तरी संघात आमची कायम सवारी, अशी बोंब हार्दिक, धवन, चहल, कुलदीप, राहुल, बुमरा, रोहित यांनी ठोकली आणि गुलाल उधळला गेला.