मुंबई - भारतीय क्रिकेट संघातील अनेक आघाडीचे खेळाडू सध्या दुखापतींशी झुंजत आहेत. बांगलादेश दौऱ्यावरही भारतीय संघातील अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघात येऊ शकले नव्हते. या सर्वांदरम्यान, भारतीय फॅन्ससाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा आणखी एक घातक वेगवान गोलंदाज जखमी झाला आहे. तो सध्या रणजी करंडक स्पर्धेमध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळत होता. आयपीएल २०२३ मध्ये लिलावामध्येही त्याचा सहभाग अनिश्चित वाटत आहे.
आयपीएलसाठी २३ डिसेंबर रोजी मिनी ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. रणजी करंडक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात खेळताना इशांत शर्माला दुखापत झाली आहे. इशांत शर्मा या सामन्यातील पहिल्या डावात पूर्णपणे फ्लॉप झाला होता. त्याला २० षटकांमध्ये केवळ एक फलंदाज बाद करण्यात यश मिळवण्यात आले होते. तर दुसऱ्या डावात अनफिट झाल्यामुळे त्याला एकही षटक गोलंदाजी करता आली नव्हती.
इशांत शर्मा आयपीएल २०२३ च्या लिलावामध्ये ५० लाख रुपयांच्या बेस प्राईससह उतरण्याची शक्यता आहे. मात्र आता झालेली दुखापत त्याच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. इशांत शर्मा आयपीएल २०२३ मध्येही अनसोल्ड राहिला होता. इशांत शर्मा आयपीएलमध्ये एकूण ६ संघांकडून खेळला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून तो शेवटचा खेळताना दिसला होता.
इशांत शर्माने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर २०२१ मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळालेले नाही. इशांत शर्माने भारताकडून आतापर्यंत १०५ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ३११ बळी टिपले आहेत. तर त्याने ८० एकदिवसीय सामन्यात ११५ विकेट्स आणि १४ टी २० सामन्यांमध्ये ८ विकेट्स टिपल्या आहेत. इशांत शर्माचं वय ३४ वर्षे झालं असून, ही दुखापत त्याच्या करिअरसाठी चिंतेची बाब ठरू शकते.