कॅन्डी : ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर असलेल्या विराट अॅन्ड कंपनीला श्रीलंकेविरुद्ध आज, शनिवारपासून सुरू होत असलेल्या तिसºया आणि अखेरच्या कसोटीत विजय नोंदवून परदेशात तीन सामन्यांच्या मालिकेत ‘व्हाईट वॉश’ करण्याची नामी संधी असेल. भारताने गाले कसोटी ३०४ धावांनी व त्यानंतर कोलंबो कसोटी १ डाव ५३ धावांनी जिंकली होती.
काही महिन्यांपासून बदल प्रक्रियेचा सामना करीत असलेल्या लंकेने या औपचारिक सामन्यासाठी हिरवीगार खेळपट्टी तयार केली आहे. खराब हवामानामुळे सामन्याच्या आदल्या दिवशी भारत सरावापासून वंचित राहिला.
हिरवीगार खेळपट्टी पाहता भारतीय संघात भुवनेश्वर कुमारला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून स्थान दिले जाईल. तो निलंबित रवींद्र जडेजाचे स्थान घेईल.
दुसरी शक्यता अशी की, भुवी हार्दिक पांड्याचे स्थान घेऊ शकतो शिवाय चायनामॅन कुलदीप यादव याला दुसरा फिरकी गोलंदाज म्हणून खेळविले जाऊ शकते. यादवने धर्मशाळा येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध चार गडी बाद केले. त्याची ही कामगिरी सामन्यात निर्णायक ठरली होती. तिसरी कसोटी जिंकल्यास हा संघ नवे विक्रम नोंदविण्याची क्षमता बाळगतो, हे कोच रवी शास्त्री यांचे आधीचे वक्तव्य खरे ठरणार आहे. (वृत्तसंस्था)
यजमान संघात दोन नवे चेहरे...
लंकेने जखमी नुवान प्रदीप आणि रंगना हेरथ यांच्या जागी संघात वेगवान गोलंदाज दुष्यंता चामिरा आणि लाहिरू गामेगे यांना स्थान दिले.
आकडे काय सांगतात...
कोहलीच्या नेतृत्वात भारत आतापर्यंत २८ कसोटी सामने खेळला. त्यात त्याने एकदाही सारखा संघ खेळविला नाही. हाच ‘ट्रेंड’ या कसोटीतही पाहायला मिळू शकतो.
भारताने १९३२ ला कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून ८५ वर्षांत विदेशात कधीही ‘व्हाईट वॉश’ केलेले नाही. आपल्याच देशातही भारताला अधिक ‘व्हाईट वॉश’ करण्यात अपयश आले. केवळ चारच कसोटी मालिकेत सर्वच्या सर्व सामने जिंकले होते.
मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वात भारताने १९९३ मध्ये इंग्लंडला ३-० ने आणि १९४३ साली श्रीलंकेला ३-० ने , महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात आॅस्ट्रेलियाला ४-० ने आणि मागच्या वर्षी कोहलीच्या नेतृत्वात न्यूझीलंडला ३-० ने पराभूत केले.
विदेशात भारताने जे अविस्मरणीय विजय नोंदविले त्यात कपिल देवच्या नेतृत्वाखालीा १९८६ साली इंग्लंडमध्ये २-० ने मिळालेला विजय, पाकमध्ये २००४ मध्ये २-१ ने आणि २०१५ मध्ये श्रीलंकेवर २-१ ने मिळालेल्या विजयाचा समावेश आहे.
भारताने पतोडी यांच्या नेतृत्वात १९६७-६८ साली न्यूझीलंडमध्ये ३-१ ने मालिका विजय नोंदविला होता. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २००४-०५ मध्ये बांगलादेशला, २००५ मध्ये झिम्बाब्वेला आणि २००९ मध्ये पुन्हा बांगलाचा सफाया केला.
विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू : चांदीमल
पाल्लेकल : भारताविरुद्ध तिसरी आणि अखेरची कसोटी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे लंकेचा कर्णधार दिनेश चांदीमल याने म्हटले आहे. तो म्हणाला,‘कर्णधार म्हणून मी पराभूत होऊ इच्छित नाही. आम्ही विजयासाठी प्रयत्न करीत आहोत; पण निकाल आमच्या आवाक्याबाहेर चालले. दडपण असले तरी तिसरा सामना जिंकण्याचा विश्वास आहे. हेरथच्या कमरेत दुखणे उमळल्याने संघाचे मोठे नुकसान झाले आहे. भारताविरुद्ध सामना जिंकणे कठीण असले तरी आम्ही आव्हान पेलण्यास सज्ज आहोत. अनेक सीनियर्स संघात नसले तरी बहाणेबाजी करणार नाही. कठीण समयी संघाला कर्णधाराची गरज असते आणि ही जबाबदारी मी निभावणार आहे.’
उभय संघ असे
भारत : विराट कोहली (कर्णधार ), शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, रिद्धिमान साहा, ईशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार , मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद, अक्षर पटेल.
श्रीलंका : दिनेश चांदीमल (कर्णधार) , उपुल थरंगा, दिमुथ करुणारत्ने, कुशाल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, लाहिरू तिरिमाने, धनंजय डिसिल्व्हा, निरोशन डिकवेला, दिलरूवान परेरा, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो, दुष्मंता चामिरा, लाहिरू गमागे, लक्षण संदाकन, मलिंडा पुष्पकुमारा.
सामन्याची वेळ : सकाळी १० वाजल्यापासून
Web Title: Team India's mission 'WhiteWash', the last Test against Sri Lanka from today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.