१४ जुलै २०२३ मध्ये चंद्राच्या दिशेनं यशस्वीरित्या झेपावलेलं चांद्रयान-३ ने आज इतिहास रचला. भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण सत्यात उतरला. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चांद्रयान-३ मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. आयर्लंड दौऱ्यावर गेलेला भारतीय क्रिकेट संघही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी टीव्हीसमोर उभा होता आणि विक्रम चंद्राच्या पृष्टभागावर उतरताच खेळाडूंनी जल्लोष केला.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळवणारा रशिया, अमेरिका, चीन या देशांनंतरचा चौथा देश ठरला आहे. २०१९ साली भारताच्या चांद्रयान-२ या मोहिमेत अंतिम क्षणी अपयश आल्याने इस्त्रोसह देशवासियांची निराशा झाली होती. १४ जुलै २०२३ रोजी चांद्रयान-३ हे यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले होते. त्यानंतर एकएक टप्पा पार करत हे या चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते. अखेर आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रयान-३ मधील विक्रम लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्टभागाच्या दिशेने झेप घेत चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरला.
आयपीएलमधील फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने चंद्रयान ३ च्या यशाचा व्हिडीओ पोस्ट केला अन् त्यावर मिशन मंगल चित्रपटातील अक्षय कुमार याचा डायलॉग लिहिला. तो म्हणजे, पुरी दुनिया से कहो, कॉपी दॅट