IND vs ENG, 3rd T20, Mohammed Shami Fitness Update : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघानं जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला संघात संधी दिली. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो पहिल्यांदा भारतीय संघाच्या ताफ्यात दिसला. पण अजूनही तो मैदानात उतरलेला नाही. पहिल्या दोन सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या फिटनेसचा मुद्दा चर्चेत आला. तिसऱ्या टी-२० सामन्यात तरी त्याला संधी मिळणार का? असा प्रश्न आता उपस्थिती केला जात आहे. यासंदर्भात एक हिंटही मिळाली आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय ताफ्यातील प्रशिक्षकाने दिली हिंट
राजकोटच्या मैदानात रंगणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्याआधी भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी भारतीय गोलंदाजाच्या फिटनेस संदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मोहम्मद शमी पूर्णपणे फिट आहे. त्यांचे हे वक्तव्य शमी तिसऱ्या टी-२० सामन्यात मैदानात उतरण्यासाठी तयार आहे, असे संकेत देणारा आहे. पण त्यांनी हे वक्तव्य करताना शमीला कोणत्या सामन्यात खेळवायचे हा निर्णय संघ व्यवस्थापन घेईल, या शब्दांवरही त्यांनी भर दिला. त्यामुळे शमी खेळणार की नाही, ते ठाम सांगणे कठीणच आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडिया 'नो रिस्क मोड'वर
इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेपेक्षा भारतीय संघासाठी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. या स्पर्धेआधी जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे टीम इंडिया थोडी बॅकफूटवर आहे. बुमराहचा संघात समावेश करण्यात आला असला तरी तो त्याच ताकदीनं गोलंदाजी करू शकेल का? याबाबत शंका आहे. त्यात मोहम्मद शमीही संघात आहे. तो दुखापतीतून सावरून संघात परतत असल्यामुळे संघ व्यवस्थापन मोठ्या स्पर्धेआधी या गोलंदाजांबाबत नो रिस्क मोडवर असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय संघ मालिका विजयाच्या उंबरठ्यावर
इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यातील विजयासह मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. राजकोटचं मैदान मारून टीम इंडिया मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे पाहुणा इंग्लंड संघ मालिकेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.