मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या पदासाठी सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह टॉम मूडी, माइक हेसन, फिर सिमॉन्स, लालचंद राजपूत आणि रॉबीन सिंग हे शर्यतीत आहेत. माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालीली त्रिसदस्यीय समिती प्रशिक्षकाचा अंतिम निर्णय घेणार आहे. 16 ऑगस्टला मुलाखती होणार असून याच दिवशी मुख्य प्रशिक्षकाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या पदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांच्यासह न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, वेस्ट इंडिजचे माजी सलामीवीर फिल सिमॉन्स, भारताचा माजी खेळाडू रॉबीन सिंग आणि भारताचे माज व्यवस्थापक आणि झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी अर्ज केले आहेत. त्याशिवाय भारताचे माजी कसोटीपटू प्रविण आम्रे यांनी फलंदाजी प्रशिक्षक, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जाँटी ऱ्होड्सने क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले आहेत.
उमेदवारांपैकी सिमन्स यांच्याकडे आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट प्रशिक्षक पदाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनात दोन्ही संघांनी यश मिळवले. 2016 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजला जेतेपद मिळवून देण्यात देखील सिमन्स यांचा मोठा वाटा आहे. हेसन हे न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक आहेत. तर टॉम मुडी हे श्रीलंकेचे प्रशिक्षक आहेत. भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यासह माजी फलंदाज व प्रशिक्षक अंशुमन गायकवाड व महिला संघाची माजी कर्णधार शांता रंगास्वामी सल्लागार समितीचे सदस्य आहेत. सध्या रवी शास्त्री आणि त्यांच्या टीमला 45 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर नवीन प्रशिक्षक निवडला जाईल.
कोहलीला मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्रीच हवे आहेत आणि हे त्यानं उघडपणे जाहीरही केले आहे. कोहली म्हणाला,'' रवी शास्त्रीच प्रशिक्षकपदी कायम राहिल्यास मला आणि संघाला आनंद होईल. क्रिकेट सल्लागार समितीनं याबाबत माझ्याकडे मत मागितलेले नाही आणि ही प्रक्रिया कशी पार पाडेल, हेही मला माहीत नाही. पण, सल्लागार समितीनं माझं मत विचारल्यास, मी त्यांच्याशी चर्चा करीन. शास्त्रींसोबत संघ चांगली कामगिरी करत आहे आणि आम्ही एकमेकांचा आदर करतो. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायला आवडेल.'' c