हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये २१ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारतीय संघातील स्टार खेळाडू या सामन्यात अपयशी ठरले. वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघातील मॅचविनरपैकी एक असलेला फलंदाजही टी-२० मध्ये फ्लॉप ठरत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्येही हा खेळाडू खास चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे आता दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये या खेळाडूला संघातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
पहिल्या टी-२० सामन्यामध्ये भारतीय संघ १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. तेव्हा सलामीवीर ईशान किशनवर संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी होती. मात्र तो अवघ्या १४ धावा काढून माघारी परतला. त्याआधी श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेमध्येही मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला होता.
श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये इशान किशनला ३७, २ आणि १ अशा मिळून ४० धावा जमवता आल्या. मात्र तरीही त्याला भारतीय संघात स्थान कायम राहिले आहे. इशान किशनने आतापर्यंत २५ सामने खेळले असून, त्यात त्याने ६३३ धावा जमवल्या आहेत. त्यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे.
इशान किशनने बांगलादेशविरुद्ध १३१ चेंडूमध्ये २१० धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो रातोरात स्टार बनला. मात्र वनडेत चांगली कामगिरी करणारा इशान टी-२० मध्ये मात्र अपयशी ठरत आहे. अशा परिस्थिती पुढच्या सामन्यात त्याच्या जागी पृथ्वी शॉ याला संघात स्थान मिळू शकते.