Team India's schedule in World Cup 2023: भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सहभाग घेणारे १० संघ निश्चित झाले आहे. भारतासह बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान यांनी आधीच वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता निश्चित केली होती. उर्वरित दोन जागांसाठी झिम्बाब्वे येथे १० देशांमध्ये पात्रता स्पर्धा रंगली. श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे हॉट फेव्हरिट होते, परंतु दोन वेळच्या वर्ल्ड कप विजेत्या विंडीजची कामगिरी टुकार झाली. नेदरलँड्स, झिम्बाब्वे यांनी त्यांना हार मानण्यास भाग पाडून स्पर्धेबाहेर फेकले. श्रीलंकेने मुख्य फेरीची जागा पक्की केली आणि दुसऱ्या जागेसाठी झिम्बाब्वे, नेदरलँड्स व स्कॉटलंड यांच्यात शर्यत होती.
स्कॉटलंडने दोन दिवसांपूर्वी झिम्बाब्वेला पराभूत करून यजमानांचा पत्ता कट केला. त्यानंतर आज नेदरलँड्सने ४२.५ षटकांत २७८ धावांचे लक्ष्य पार करून स्कॉटलंडला अलगद बाहेर फेकले. २०११ नंतर नेदरलँड्स प्रथमच वन डे वर्ल्ड कप खेळणार आहे. विजयासाठी ४४ षटकांत २७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सची अवस्था वाईट झाली होती. पण, बॅस डे लीडने कमाल केली. त्याने साकिब जुल्फिकार सह सहाव्या विकेट्ससाठी शतकी भागीदारी केली आणि ऐतिहासिक विजय मिळवला. बॅस डे लीडने या सामन्यात ५ विकेट्स व १२३ धावा केल्या. असा पराक्रम करणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी, रोहन मुस्ताफा ( १०९ व ५-२५ वि. PNG), पॉल कॉलिंगवूड ( ११२* व ६-२१ वि. बांगलादेश ) आणि व्हिव्ह रिचर्ड्स ( ११९ व ५-४१ वि. न्यूझीलंड) यांनी असा पराक्रम केला.
श्रीलंका आणि नेदरलँड्स आता वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहेत आणि त्यामुळे भारतासह सर्वच वेळापत्रक अपडेट झाले आहे. जाणून घेऊया भारताला या दोन संघांविरुद्ध केव्हा व कुठे खेळावे लागणार आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाचं वेळापत्रक
८ ऑक्टोबर- भारत वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई
११ ऑक्टोबर - भारत वि. अफगाणिस्तान. दिल्ली
१५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहदाबाद
१९ ऑक्टोबर - भारत वि. बांगलादेश, पुणे
२२ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझिलंड, धर्मशाला
२९ ऑक्टोबर- भारत वि. इंग्लंड, लखनौ
२ नोव्हेंबर - भारत वि. श्रीलंका, मुंबई
५ नोव्हेंबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता
११ नोव्हेंबर - भारत वि. स्कॉटलंड, बंगळुरू
Web Title: Team India's schedule in World Cup 2023: sri lanka will be qualifier 1 and netherlands will be qualifier 2 team in schedule of world cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.