Ajinkya Rahane News : भारतीय संघाचा मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे खासकरून त्यांच्या संयमी खेळीसाठी ओळखला जातो. मागील मोठ्या कालावधीपासून रहाणे भारतीय संघातून बाहेर आहे. मागील वर्षी जुलैमध्ये रहाणेने शेवटचा कसोटी सामना खेळला होता, तर २०१८ मध्ये तो भारताच्या वन डे संघात दिसला होता. आयपीएल २०२४ चा हंगामही त्याच्यासाठी काही खास गेला नाही. तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना संघर्ष करताना दिसला. सध्या रहाणे इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट वन डे कप खेळत आहे. लेस्टरशायरकडून खेळताना त्याने झंझावाती अर्धशतकी खेळी करून आपल्या संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. (Ajinkya Rahane Latest News)
वन डे कप २०२४ च्या ब गटातील लेस्टरशायर आणि नॉटिंगहॅमशायर हे संघ बुधवारी आमनेसामने आले. या सामन्यात लेस्टरशायरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ६ गडी गमावून ३६९ धावा केल्या. रहाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने ६० चेंडूंचा सामना करत ७१ धावा कुटल्या. रहाणेच्या खेळीत ९ चौकारांचा समावेश होता. तर लुईस हिलने ८१ धावांची दमदार खेळी केली.
रहाणेची झंझावाती खेळी
अजिंक्य रहाणे भारतीय संघातून बाहेर असला तरी एक प्रमुख खेळाडू म्हणून त्याने संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली होती. रहाणेने भारतासाठी शेवटचा वन डे सामना २०१८ मध्ये खेळला होता. तर शेवटचा ट्वेंटी-२० सामना २०१६ मध्ये खेळला गेला होता. रहाणेने टीम इंडियासाठी २० ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये ३७५ धावा केल्या आहेत. ९० वन डे सामन्यांमध्ये रहाणेच्या नावावर २९६२ धावांची नोंद आहे. ८५ कसोटी सामने खेळणाऱ्या रहाणेने टीम इंडियाच्या कसोटी संघाची धुरा देखील सांभाळली आहे.