Hardik Pandya Post : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याने भारतीय संघासाठी अप्रतिम कामगिरी केली. अखेरच्या षटकात १६ धावांचा बचाव करताना त्याने डेव्हिड मिलर आणि कगिसो रबाडा यांना बाद केले. त्यामुळेच टीम इंडियाला तब्बल ११ वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकता आली. विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली. मात्र, वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. पण, आगामी मालिकेत हार्दिक दिसणार का हे पाहण्याजोगे असेल.
हार्दिक पांड्या नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतो. आता त्याने दोन वेगवेगळे फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधले. कठीण काळातील प्रवास सांगताना हार्दिकने फिटनेसचे महत्त्व पटवून दिले. हार्दिक पांड्याने दोन वेगवेगळे फोटो शेअर करताना म्हटले की, वन डे विश्वचषक २०२३ मधील दुखापतीनंतर खूप कठीण प्रवास होता, परंतु ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्यामुळे तो प्रयत्न सार्थकी लागला. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न कराल तोपर्यंत परिणाम मिळत असतात. मेहनत कधीच वाया जात नाही. चला तर मग आपण सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न करूया आणि आपल्या फिटनेसवर काम करूया. हार्दिकच्या या पोस्टवर चाहते कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, मागील IPL आधी हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा संघ सोडून मुंबई इंडियन्समध्ये आला. रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून त्याला संघाचे नेतृत्व देण्यात आले. हा बदल मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना रुचला नाही. त्यामुळे हार्दिकला IPL दरम्यान प्रचंड ट्रोल करण्यात आले. मुंबईच्या संघात रोहित आणि हार्दिक असे दोन गट पडल्याचेही बोलले जात होते. IPL दरम्यान आणि स्पर्धा संपल्यानंतरही इशान किशन हा हार्दिक पांड्यासोबत सातत्याने दिसायचा. खास मित्र म्हणून हार्दिकला इशानने कठीण काळात साथ दिली. त्यामुळे किशनने अलीकडेच हार्दिकच्या कठीण काळाबद्दल भाष्य केले होते.
Web Title: team india's star all rounder Hardik Pandya says Hard work is never wasted
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.