Indian Athlete For Paris Olympics 2024 : पॅरिसमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकसाठी भारतीय शिलेदार सज्ज आहेत. येत्या २६ तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. तमाम भारतीय आपल्या खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवत आहेत. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळीही ऑलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर खेळणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देत आहे. अशातच टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्रा अँड कंपनीला शुभेच्छा दिल्या. २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ पर्यंत या बहुचर्चित स्पर्धेचा थरार रंगेल. ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्वच क्षेत्रातील खेळाडू आपल्या जीवाची बाजी लावत असल्याचे दिसतात.
विराटने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना एक खास संदेश दिला. इंडिया, भारत, हिंदुस्थान... एक काळ असा होता की जगभर भारताकडे फक्त साप आणि हत्तींची भूमी म्हणून पाहिले जायचे. पण काळानुसार हे बदलत गेले. आज आपल्या देशाला जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून ओळखले जात आहे. आपला देश क्रिकेट, बॉलिवूड, स्टार्टअप युनिकॉर्न आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था यासाठी ओळखला जाऊ लागला आहे.
विराटने आणखी म्हटले की, आता आपल्या या महान देशासाठी मोठी गोष्ट कोणती आहे? जास्तीत जास्त सुवर्ण पदक, रौप्य पदक आणि कांस्य पदक जिंकणे खूप महत्त्वाचे असेल. आपले खेळाडू पॅरिसला गेले आहेत आणि पदकांसाठी लढत आहेत. आमचे खेळाडू ट्रॅक, फील्ड आणि रिंगमध्ये पाऊल ठेवताच इंडिया इंडिया इंडिया असा जयघोष होतो.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमधून भारताला चांगल्या पदकांची आशा असेल. मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सात पदके जिंकली होती. नीरज चोप्राच्या रूपात भारतात एकमेव सुवर्ण पदक आले. तर दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांनी भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली.