भारताच्या राष्ट्रीय संघातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. याचेच फळ त्याला मिळत असल्याचे दिसते. कारण भुवीला लखनौच्या फ्रँचायझीने आपल्या ताफ्यात घेतले आहे. आयपीएल २०२५ पूर्वी लखनौ फाल्कन्सने यूपी टी-२० लीगच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी भुवनेश्वर कुमारला आपल्या संघाचा भाग बनवले. त्याच्याशिवाय फिरकीपटू पियुष चावला आणि शिवम मावी यांसारख्या खेळाडूंवरही बोली लागली.
खरे तर यूपी टी-२० चा पहिला हंगाम भुवीसाठी खूप चांगला राहिला होता. त्याने आपल्या गोलंदाजीने अप्रतिम कामगिरी करून सर्वांची मने जिंकण्यात यश मिळवले. अशा स्थितीत लखनौच्या फ्रँचायझीने दुसऱ्या हंगामासाठी सर्वाधिक ३० लाख रुपयांची बोली लावून भुवीला आपल्या संघाचा भाग बनवले आहे. भुवी नोएडा सुपर किंग्जकडून शेवटचा हंगाम खेळला होता.
दरम्यान, यूपी टी-२० लीग २०२३ मध्ये भुवनेश्वर कुमार नोएडा सुपर किंग्जसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. याशिवाय पदार्पणाच्या हंगामात सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत भुवीने चौथ्या क्रमांकावर कब्जा केला होता. मागील हंगामात त्याने ९ सामन्यांमध्ये १४ बळी घेतले होते.
भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने प्रभावी कामगिरी केली. भुवीने आयपीएल २०२४ मध्ये खेळलेल्या १६ सामन्यांमध्ये ९.३५ च्या सरासरीने गोलंदाजी करून ११ बळी घेतले आहेत. त्याने टीम इंडियासाठी त्याने २१ कसोटी सामने खेळले असून ६३ बळी पटकावले आहेत. याशिवाय १२१ वन डे सामने खेळणाऱ्या भुवीने १४१ बळी घेतले आहेत. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अर्थात ट्वेंटी-२० मध्ये त्याच्या नावावर ८७ सामन्यांमध्ये ९० बळींची नोंद आहे.