भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. चहलला बीसीसीआयच्या केंद्रीय करारात देखील स्थान मिळाले नाही. त्यामुळे भारतीय संघात पुनरागमन करणे हे त्याच्यासमोरील मोठे आव्हान आहे. सध्या तो डी य पाटील ट्वेंटी-२० चषकात खेळत आहे. चहलने केलेल्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर आयकर विभागाने डी वाय पाटील ट्वेंटी-२० स्पर्धेत कॅनरा बँक संघावर १३५ धावांनी विजय मिळवला. हा सामना मंगळवारी डी वाय पाटील युनिव्हर्सिटी ग्राउंड येथे झाला.
आयकर विभागाने प्रथम फलंदाजी करताना विशांत मोरे (२८ चेंडूत ६१, आठ चौकार व तीन षटकार) व शेल्डन जॅक्सन (३२) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९६ धावांची भागीदारी केली. यानंतर कर्णधार महिपाल लोमरोरने २१ चेंडूत ४९ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत पाच षटकार व दोन चौकार लगावले. मग, सुमित कुमारने १८ चेंडूत ५३ धावांची खेळी करताना चार चौकार व पाच षटकार झळकावले. त्यामुळे आयकर विभागाने २० षटकांत ५ बाद २४४ धावा केल्या.
चहलची प्रभावी गोलंदाजीआव्हानाचा पाठलाग करताना कॅनरा बँक संघ १६ षटकांत १०९ धावांवर आटोपला. आयकर विभागाकडून चहल (४/२२), प्रदीप्त प्रामाणिक (२/२४) व सुमित कुमार (२/१३) यांनी चांगली गोलंदाजी केली. तर, डी वाय पाटील स्टेडियम येथे झालेल्या आणखी एका सामन्यात रिलायन्स वन संघाने जैन इरिगेशन संघाविरुद्ध २० षटकांत ६ बाद १८७ धावा केल्या. संघाकडून नमन धीर (३३ चेंडूत ५५, आठ चौकार व एक षटकार) याने निर्णायक खेळी केली. जैन इरिगेशन संघाकडून अर्शद खान (२/२७) व मयांक यादव (२/४५) यांनी चांगली गोलंदाजी केली.
लक्ष्याचा पाठलाग करताना इरिगेशन संघाचे ठराविक अंतराने गडी बाद झाले. संघाकडून सूरज शिंदे (नाबाद ३०) व अर्शद खान (नाबाद ४०) यांनी नवव्या गड्यासाठी ५३ धावांची अभेद्य भागीदारी रचली. मात्र, त्यांना पाच धावांनी पराभूत व्हावे लागले. इरिगेशन संघाने २० षटकांत ८ बाद १८२ धावा केल्या. रिलायन्स वन संघाकडून नमन धीर (२/२६), देव लाक्रा (२/१२) आणि कर्णधार पियूष चावला (२/४१) यांनी चांगली गोलंदाजी केली.