Mohammed Shami on Inzmam Ul Haq : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात पराभव केला अन् ११ वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकला. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगने चमकदार कामगिरी केली होती. याचाच दाखला देत पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू इंझमाम-उल-हकने एक हास्यास्पद टिप्पणी केली होती. यावरून भारतीय कर्णधार रोहित शर्माने शेजाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. आता वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने इंझमामवर सडकून टीका केली.
इंझमाम काय म्हणाला होता?
इंझमाम पाकिस्तानमधील टीव्ही शोमध्ये बोलताना म्हणाला की, अर्शदीप जेव्हा १५ वे षटक टाकत होता तेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता. हे खूप लवकर घडले. याचाच अर्थ १२व्या षटकापर्यंत चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यासाठी सक्षम झाला होता. आता पंचांनी डोळे उघडे ठेवून पाहायला हवे. चेंडू रिव्हर्स स्विंग कसा आणि केव्हा होतो याची आम्हाला माहिती आहे. जर अर्शदीप सिंगला १५व्या षटकात रिव्हर्स स्विंग मिळत असेल तर याचा अर्थ चेंडूशी काहीतरी छेडछाड केली गेली आहे.
इंझमामच्या विधानावर बोलताना शमीने सांगितले की, पाकिस्तानमधून आता आणखी एक नमुना समोर आला आहे. त्यांनी अर्शदीप सिंगने रिव्हर्स सिंग कसा केला याबद्दल प्रश्न उपस्थित केला. मला इंझमाम-उल-हकला एकच सांगायचे आहे की तुम्ही असे केले तर तो जादुई चेंडू बनतो, पण जर दुसऱ्याने केले तर त्याला बॉल टॅम्परिंग म्हणतात. असे विधान या उंचीच्या खेळाडूला शोभत नाही. मी त्याला सांगेन की, चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यासाठी कोणत्याही जादूची आवश्यकता नसते. शमी एका पॉडकास्टवर बोलत होता.
तसेच पाकिस्तानातील मंडळीला भारताला मिळाले यश कधीच पाहवत नाही. ते आमच्या यशाने कधीच खूश होत नाहीत. त्यांच्या गोलंदाजांनी रिव्हर्स स्विंग केले तर ते कौशल्य असते असा त्यांचा समज आहे. पण, भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यावर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला जातो, असेही मोहम्मद शमीने म्हटले.
Web Title: Team India's star player Mohammad Shami has criticized Pakistan's Inzmam Ul Haq
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.